फोन टॅपिंग करून कर्नाटक सरकार पाडले, ‘द वायर’चा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकमधील जेडीएस आणि कॉँग्रेस आघाडीचे सरकार फोन टॅपिंग करून पाडण्यात आले, अशी धक्कादायक माहिती पेगासस प्रकरणात पुढे आली आहे. जुलै 2019 मध्ये कर्नाटकात कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील सरकार कोसळले आणि भाजपने सत्ता स्थापन केली. या संपूर्ण घटनाक्रमाचा कथित हेरगिरीशी संबंध असल्याचा दावा ‘द वायर’ने केला आहे.

कर्नाटकात 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या, मात्र त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे दुसऱया क्रमांकावर असलेल्या काँग्रेसने जेडीएससोबत सत्ता स्थापन केली. दुसऱया क्रमांकाच्या जागा मिळूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्रीपद दिले होते. कॉँग्रेसच्या या खेळीमुळे दुखावलेल्या भाजपने पेगासस स्पायवेअर तंत्राचा वापर करून हेरगिरी करत कर्नाटकातील सरकार पाडल्याची माहिती समोर आली आहे.

कुमारस्वामी, जी. परमेश्वर यांच्या सचिवांचे फोन टॅप

2019 मध्ये कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दलाचे (सेक्युलर) सरकार होते. या सरकारशी संबंधित काही व्यक्तींचे फोन नंबर टॅप करण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर, माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या सचिवांच्या फोन क्रमांकांची निवड त्यासाठी करण्यात आली होती. क्रमांकांच्या रेकॉर्ड्सचा आढावा घेत असताना हे क्रमांक दिसून आल्याचे ‘द वायर’ने म्हटले आहे.