कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदानचे रॅकेट, बोगस डॉक्टर राणी कांबळेला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

करवीर तालुक्यातील परिते येथील अवैध गर्भलिंग निदान तपासणी केंद्राची संशयित सूत्रधार, कथित डॉक्टर आणि दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या छाप्यातून गायब झालेल्या राणी कांबळे (रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) हिला करवीर पोलिसांनी आज अटक केली. याप्रकरणी यापूर्वी पाचजणांना अटक करण्यात आलेली आहे.

परिते येथील साताप्पा खाडे याच्या घरात अवैधरीत्या गर्भलिंग निदान तपासणी केंद्र सुरू असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांचे पथक व करवीर पोलिसांनी तेथे छापा टाकून सूत्रधार महेश पाटील, एजंट सचिन घाटगे, भारत जाधव, घरमालक साताप्पा खाडे व पत्नीची तपासणी करण्यासाठी आलेला पती अनिल माळी या पाचजणांना अटक केली होती. या कारवाईत सोनोग्राफी मशीन व रोख रक्कम असा सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

मात्र, या कारवाईवेळी या गर्भलिंग तपासणी केंद्राची मुख्य सूत्रधार समजली जाणारी राणी कांबळे ही निसटली होती. ती डॉक्टर नसल्याचेही सांगण्यात येत होते. आज करवीर पोलिसांनी तिलाही अटक केली आहे.