फोन टॅपिंगवरून संसदेत रणकंदन, माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांचे निवेदन तृणमूल खासदाराने फाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेगॅसस अर्थात फोन टॅपिंग प्रकरणाचे तीव्र पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहांत उमटले. विरोधकांनी घोषणाबाजी करत सरकारला चांगलेच घेरल्याने अभूतपूर्व गोंधळ उडाला. राज्यसभेत केंद्रीय माहिती-तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव निवेदन करण्यासाठी उभे राहताच तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांनी त्यांच्या हातातील पेपर खेचून घेतला आणि टराटरा फाडला. सभागृहात रणकंदन माजल्यामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. लोकसभेतील गोंधळामुळे कामकाज तहकूब केले.

राज्यसभेतील कामकाज सुरू होताच विरोधकांनी शेतकऱयांचे जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाकडे लक्ष वेधले. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करीत घोषणाबाजी केली. तसेच एका बडय़ा वृत्तपत्र समूहावर आयकर विभागाने टाकलेल्या धाडीचा मुद्दाही उपस्थित केला. पेगॅसस प्रकरणी माहिती -तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव हे निवदेन देतील, असे सभापती व्यंकय्या नायडू यांनी जाहीर केले. वैष्णव जागेवरून उठून निवेदन करत असतानाच, विरोधकांनी घोषणाबाजी केली. तृणमूलचे खासदार शंतनू सेन वैष्णव यांच्याजवळ गेले आणि निवेदनाचा कागद त्यांनी टरटरा फाडला. यावेळी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी व शंतनू सेन यांच्यात शाब्दिक बाचाबाचीही झाली. हा सगळा प्रकार पाहून, सभापती नायडू यांनी सभागृहाचे कामकाज सुरळीत चालावे अशी तुम्हा लोकांची इच्छा दिसत नाही, असे सांगत राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

लोकसभेतही प्रश्नोत्तराचा तास केवळ तेरा मिनिटे चालला. शेतकरी आंदोलन, महागाई, पेगॅसस, कोरोना व्यवस्थापन या मुद्दय़ांवरून विरोधकांनी घोषणाबाजीला सुरूवात केली. त्यामुळे सभापती ओम बिर्ला यांनी कामकाज दुपारी बारापर्यंत व त्यानंतर दुपारी दोनपर्यंत तहकूब केले. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतर संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी कोरोनाच्या स्थितीवर राज्यसभेत चांगली चर्चा झाली. लोकसभेतही सरकार विरोधकांच्या प्रत्येक शंकेवर मुद्दयावर चर्चा करण्यास तयार आहे. विरोधकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. आक्रमक विरोधकांनी घोषणाबाजी सुरू ठेवली. अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

काँग्रेस व अकाली दलाचे आंदोलन

जंतरमंतरवर शेतकरी नेत्यांनी प्रतिसंसद आयोजित केलेली असताना, त्याला पाठिंबा देण्यासाठी संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काँग्रेsस व अकाली दलाने आंदोलन केले. संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेsसच्या खासदारांनी महात्मा गांधीजी पुतळ्याजवळ जमून शेतकऱयांच्या समर्थनार्थ आंदोलन केले. यावेळी मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. अकाली दलाच्या खासदारांनीही त्यानंतर या ठिकाणी आंदोलन केले.

पेगॅसस प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

देशभरात खळबळ माजविणारे पेगॅसस प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. हे प्रकरण म्हणजे मोठे स्पँडल असून, देशाच्या लोकशाहीवर हल्ला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी करावी, अशी याचिका दाखल करण्यात आली आहे.

अॅड. मनोहरलाल शर्मा यांनी ही याचिका दाखल केली आहे. विरोधी पक्षांचे नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन टॅपिंग करून हेरगिरी करणे गंभीर गुन्हा आहे. हा लोकशाहीवर हल्ला असून, त्याची सखोल चौकशी करण्यासाठी न्यायालयाने एसआयटी चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. याचिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सीबीआयला प्रतिवादी करण्यात आले आहे. दरम्यान, याचिकाकर्ते शर्मा यांनी याआधी सीबीआयने एफआयआर दाखल करावा अशी मागणी केली होती. मात्र, सीबीआयने त्यांना प्रतिसाद दिला नाही.