
तौक्ते चक्रीवादळादरम्यान माहीमच्या समुद्रात अडकून पडलेल्या दोघा खलाशांना जीवाची पर्वा न करता माहीममधील चार तरुणांनी मोठय़ा धाडसाने वाचवले.
पोहण्यात पटाईत असलेल्या या तरुणांनी खवळलेल्या समुद्रातून खलाशांची सुटका केली. मात्र, हे तरुण बेरोजगार आहेत. त्यामुळे या तरुणांना सागरी पोलीस, तटरक्षक दल, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि अग्निशमन दल या आपत्कालीन यंत्रणांमध्ये सामावून घ्यावे, अशी विनंती शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
तौकते चक्रीवादळादरम्यान माहीममधील अनिकेत तरे, मनीष तरे, निखील तरे आणि सचिन मोरे यांनी माहीम समुद्रात बुडत असणाऱया बोटीतून लाईफ जॅकेट आणि दोरखंडाने दोघा खलाशांची सुखरुप सुटका केली. किनाऱयावरून भर समुद्रात पोहत जाऊन त्यांनी ही कामगिरी केली.
त्यांच्या या धाडसाची दखल घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला. मात्र, हे तरुण बेकार असून त्यांना आपत्कालीन यंत्रणांमधील सेवेत सामावून घ्यावे आणि देशसेवेची संधी द्यावी, अशी विनंती आमदार सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
























































