
पावसाने विश्रांती घेतली असून चिपळुणातील पाणीही आता ओसरले आहे. चिपळूणात बचावकार्याला वेग आला असून चिपळुणातील मृतांचा आकडा 15 वर पोहचला आहे. खेड पोसरे येथे दरड कोसळून दुर्घटना घडली त्यापैकी 6 जणांचे मृतदेह सापडले आहेत.
चिपळूणात महापुराने प्रचंड नुकसान केले आहे. एनडीआरएफ, तटरक्षक दल, पोलीस, रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स यासंस्था मदतकार्यात सहभागी आहेत. काल शुक्रवारपर्यंत 10 मृतदेह सापडले होते. आज आणखी 5 मृतदेह सापडले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. खेड पोचरी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील सहा मृतदेह बाहेर काढले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मेहितकुमार गर्ग यांनी चिपळूण आणि खेड पोसरे गावात जाऊन पहाणी केली.
जल आराखडा बनवणार
पाऊस पडला की ऑरेंज अॅलर्ट, रेज अॅलर्ट दिले जातात. हे सगळं ठीक आहे. पण पावसाचे परिमाण आणि प्रमाण हे कुणीही ठरवू शकत नाही. ढगफुटी होईल का? ती झाली तर कुठे होईल? किती प्रमाणात पाऊस पडेल हे काहीच सांगता येत नाही. एक खूप मोठा तणाव सातारा, सांगली, कोल्हापूर भागातही होता. कारण कोयनेचे आणि इतर ठिकाणच्या धरणांचे पाणी सोडावे लागले. ते पाणी काही शहरांमध्ये घुसलं. पडणारा भयंकर पाऊस आणि त्याचा संहार पाहिल्यानंतर त्याही बाबतीत वॉटर मॅनेजमेंट अर्थात जल आराखडा बनवावा लागेल. अचानक पाणी वाढतं आणि सगळीकडे होत्याचं नव्हतं करून टाकतं. त्यासाठी त्याचं व्यवस्थापन करण्याची गरज आहे. त्यादृष्टीनेही सरकार काम करतंय, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
































































