
अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्यातील महाड मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मदतकार्यासाठी 110 अधिकारी- कर्मचारी यांचा समावेश असलेले पथक तसेच 6 जणांचा समावेश असलेले वैद्यकीय पथकही पाठविण्यात आले आहे. आवश्यक यंत्रसामग्री आणि वाहने यांच्यासह सदर पथक महाडमध्ये पोहोचले असून या पथकाने लागलीच मदत कार्यास सुरुवात देखील केली आहे.
रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमध्ये मदत कार्य करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्देशानुसार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेने पथक पाठवले आहे.
या पथकाचे नेतृत्व घनकचरा व्यवस्थापन खात्याचे कार्यकारी अभियंता श्री. गायकर आणि सहाय्यक अभियंता पाटणे हे करीत आहेत. या पथकामध्ये एकूण 110अधिकारी आणि कर्मचारी तसेच अकरा वाहने समाविष्ट आहेत. 1 पर्यवेक्षक, 5 कनिष्ठ अवेक्षक, 6 मुकादम, 75 कामगार, २१ वाहनचालक आणि २ क्लिनर असे एकूण 110 कर्मचारी पथकात समाविष्ट आहेत. तर, 4 बसेस, 3 डंपर, 1 ब्रेक डाऊन वाहन, 2 सुमो आणि 1 ट्रक अशी 11 वाहने पथकासमवेत पाठविण्यात आली आहेत. हे पथक महाडमध्ये आज दाखल झाले असून तेथे लागलीच मदत कार्य देखील सुरू करण्यात आले आहे.
या पथका व्यतिरिक्त, शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालयाच्या वतीने चार डॉक्टर आणि दोन तंत्रज्ञ यांचा समावेश असलेले वैद्यकीय पथक देखील महाडमध्ये दाखल झाले आहे. हे पथक कोविड संसर्ग सह हिवताप (मलेरिया), डेंगी, लेप्टो यासारख्या पावसाळी आजारांसंदर्भातील वैद्यकीय तपासणीसाठी स्थानिक प्रशासनाला मदत करणार आहे.
या संपूर्ण मदत कार्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर आणि उपमुख्य अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) सुनील सरदार हे समन्वय पाहत आहेत.



























































