
- दुर्गेश आखाडे
महापुरामुळे तुमचे नुकसान झाले. तुमच्या दुकानातील सामान वाहून गेले. तुम्हाला मदत निश्चितच मिळेल. त्याची अजिबात काळजी करू नका असे आश्वासन देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त नागरिकांना धीर दिला. चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे गाडीतून खाली उतरले. गांधी चौकातील दुकानदारांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूणमध्ये येणार हे समजल्यानंतर पूरग्रस्त नागरिक व व्यापारी बाजारपेठेच्या दुतर्फा उभे होते. उद्धव ठाकरे यांचा ताफा बाजारपेठेत येताच व्यापारी त्यांच्या गाडीजवळ गेले. ‘आमचे सर्वस्व गेले, आम्हाला मदत करा’ अशी कळकळीची विनंती त्यांनी केली. महापुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देताना व्यापाऱ्यांचे डोळे पाणावले होते. उद्धव ठाकरे यांनी गाडीतून खाली उतरून त्यांना धीर दिला. दुकानांमध्ये पाणी गेल्याने व्यापाऱ्यांचे जबर नुकसान झाले आहे. त्यांचा लाखोंचा माल वाहून गेला. तितकाच खराब झाला. दुकानांबाहेर त्यांच्या मालाचा कचरा पडला होता.
उद्धव ठाकरे यांनी बाजारपेठेत चालतच व्यापाऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या. त्यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांना दुकानाबाहेरील खराब मालाचा ढीग दाखवला. त्यावर ‘तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. मालाची, नुकसानीची काळजी करू नका. ते आमच्यावर सोडा. सरकार निश्चितच मदत करेल.’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी व्यापाऱ्यांना दिलासा दिला.
साहेब, होतं नव्हतं सर्व गेलं, आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका
एका महिलेने तर मुख्यमंत्र्यांसमोर टाहोच पह्डला. आम्हाला सोडून जाऊ नका, आम्हाला मदत करा, असा टाहोच एका महिलेने फोडला. सरकार तुमच्या पाठीशी आहे. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सर्वांना मदत करायलाच, तुम्हाला धीर द्यायलाच आलोय, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या महिलेला धीर दिला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेले. होत्याचे नव्हते झाले. सर्व गेले. तुम्ही काहीही करा, पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असं ही महिला मोठमोठय़ाने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिले.
































































