सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भिलवडीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली जिल्ह्यातील भिलवडी (ता. पलूस) येथील पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. त्यानंतर पूरग्रस्तांनासाठी उभारण्यात आलेल्या निवारा केंद्राला भेट देत त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. पूरग्रस्तांच्या राहण्याची, जेवण्याची सोय यबाबतची माहितीही त्यांनी घेतली.

भिलवडी परिसरातील ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो, अशा भागाचा सर्व्हे करा. वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. भिलवडी गावातील पुरग्रस्तांच्या समस्या ऐकल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरीकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही पवार यांनी दिली.

भिलवडी येथील बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. पाणी भरलेल्या बाजारपेठेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोटीतून पाहणी केली. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.