
उसने दिलेले पैसे परत मागितल्याचा राग आल्याने टोळक्याने तरुणाला दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना काल सकाळी साडेदहाच्या सुमारास हडपसरमधील ससाणेनगरमध्ये घडली. यावेळी परिसरातील स्वयंघोषित भाईने राडा घातल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
याप्रकरणी प्रथमेश आडाळे (21, रा. हांडेवाडी रस्ता) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश यांनी मित्र गौरवला काही महिन्यांपूर्वी हातउसने पैसे दिले होते. पैसे परत देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादातून गौरवने प्रथमेशला दांडक्याने मारहाण करून खाली पाडले. त्यानंतर इतर साथीदारांनी प्रथमेशला ठार मारण्याच्या हेतूने त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर आम्ही इथले भाई आहोत, तुला कोण वाचवायला येते ते पाहून घेऊ, असे ओरडून टोळक्याने परिसरात दहशत निर्माण केली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.


























































