
मोठा गाजावाजा करून टोकियो ऑलिम्पिकच्या स्वारीवर गेलेल्या हिंदुस्थानी नेमबाजांनी साफ निराशा केली. आधी वैयक्तिक प्रकारात अपयशी ठरल्यानंतर मंगळवारी सांघिक प्रकारातही हिंदुस्थानी नेमबाजांचा नेम चुकला. हिंदुस्थानच्या चारही जोडय़ा स्पर्धेतून बाहेर फेकल्या गेल्या.
मंगळवारी दोन वेगवेगळ्या प्रकारांत हिंदुस्थानच्या चार नेमबाजी जोडय़ा सहभागी झाल्या होत्या. 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात स्टेज-1मध्ये सौरभ चौधरीने धमाकेदार कामगिरी केली. त्याने 98, 100, 98 असे एकूण 296 गुण मिळवले तर त्याची जोडीदार मनू भाकरने 97, 94, 95सह 286 गुण मिळवले. या जोडीने 582 गुणांसह स्टेट-1मध्ये अक्वल स्थान मिळवल्याने त्यांच्याकडून पदकाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र स्टेज-2मध्ये ही जोडी 380 गुणांसह सातव्या स्थानावर फेकली गेली आणि देशवासीयांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला. स्टेज-1मध्ये हिंदुस्थानची दुसरी जोडी अभिषेक वर्मा-यशस्विनी देसवाल यांना मात्र अपयश आले. या जोडीला 15व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
10 मीटर एयर रायफल प्रकाराच्या मिश्र दुहेरीतही दिव्यांश सिंह पन्वर व इलवनील वलरीवन ही जोडी पात्रता फेरीत 12व्या स्थानी राहिली, तर अंजूम मुद्गील व दीपक कुमार ही जोडी 18व्या स्थानावर फेकली गेली. याआधी वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातदेखील पुरुषांमध्ये सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा यांना तर महिलांमध्ये यशस्विनी देसवाल, मनू भाकर यांना अपयश आले होते. जागतिक क्रमवारीत क्रमाक एक आणि दोन वर असलेल्या अभिषेक वर्मा आणि सौरभ चौधरी यांना अपयश आल्याने हिंदुस्थानच्या आशांना सुरुंग लागला.



























































