नेमबाजांसह प्रशिक्षकांचेही मूल्यांकन होणार! ऑलिम्पिकमधील खराब कामगिरीमुळे रनिंदर सिंग निराश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या नेमबाजी संघाकडून देशवासीयांना पदकांची अपेक्षा होती. मात्र अनपेक्षितपणे सर्वच नेमबाजांनी भ्रमनिरास केला. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रनिंदर सिंगदेखील नेमबाजांच्या फ्लॉप शोमुळे निराश झाले. ऑलिम्पिकसाठी नेमबाजी संघ तयार करताना कुठलीच कसर सोडलेली नव्हती, तरीही हाती निराशा आली. आता प्रशिक्षकांचेही मूल्यांकन करावे लागेल, असा इशाराही रनिंदर सिंग यांनी दिला.

रनिंदर सिंग म्हणाले, प्रशिक्षक जसपाल राणा आणि मनू भाकर यांच्यात वाद झाल्याने मनूसाठी रौनक पंडीत यांना प्रशिक्षक म्हणून बोलवावे लागले. खरंतर मनू भाकरने जसपाल राणांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही वर्षांत चांगली कामगिरी केली होती. मात्र ऑलिम्पिक तोंडावर असताना त्यांच्यात वाद झाल्याने रौनक पंडीत यांना आणावे लागले. जसपाल असते तर मनू भाकरला ऑलिम्पिकमध्ये कदाचित फायदाच झाला असता, असेही ते म्हणाले.

टोकियो ऑलिम्पिकमधील नेमबाजांच्या खराब कामगिरीचे कुठल्याच प्रकारे समर्थन करता येणार नाही किंवा काही कारणं सांगत बसणंही योग्य ठरणार नाही. ऑलिम्पिकच्या तयारीसाठी जे करायला हवं होतं ते सर्व संघटना या नात्याने आम्ही केलेलं आहे. मात्र बहुतांश नेमबाज हे नवखे होते. यातील बरेच 19 वर्षांच्या आतील होते. कदाचित ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च स्पर्धेचा दबाव त्यांना झेपला नसेल. मात्र क्षमता असूनही आपले नेमबाज लौकिकास साजेशी कामगिरी करू शकले नाहीत, हे सत्य आहे. – रनिंदर सिंग