
सलग चौथ्या दिवशीही जिल्ह्यात पावसाचा जोर कमी राहिला असला, तरी पंचगंगेसह सर्वच नद्या अजूनही धोकापातळीपेक्षा एक-दोन फुटांवरून वाहत आहेत. दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 56.3 अशी रेकॉर्डब्रेक पंचगंगेची पातळी आज चार दिवसांनंतर 11 फूट कमी झाली होती. आज दुपारी चारच्या सुमारास 45 फूट 6 इंच पाणीपातळी झाली होती.
दुपारी चारच्या अहवालानुसार राधानगरी धरणात 234.54 दलघमी पाणीसाठा असून, विद्युत विमोचकातून एक हजार 400 व सिंचन विमोचकातून एक हजार 428 असा एकूण दोन हजार 828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. धरणाचा पाचवा स्वयंचलित दरवाजा आज सायंकाळपर्यंत सुरूच होता, तर जिल्ह्यातील 64 बंधारे अजूनही पाण्याखालीच होते.




























































