उत्तर प्रदेशमध्ये भयंकर अपघात, बस व ट्रकच्या धडकेत 18 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील बाराबांकी येथे एका भरधाव ट्रकने बसला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 24 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांच्यावर लखनौ ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

हरयाणातील पलवाल येथून ही बस बिहारकडे निघाली होती. या बसमध्ये क्षमतेपेक्षा खूपच जास्त प्रवासी भरले होते. पोलिसांच्या अंदाजानुसार बसमध्येतब्बल 140 प्रवासी प्रवास करत होते. ही बस अयोध्या लखनौ महामार्गावरून जात असताना बाराबांकीजवळ या बसला एका भरधाव ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यात बसच्या मागच्या भागात बसलेले 18 प्रवासी जागीच ठार झाले तर 24 जण जखमी झाले.

‘मंगळवारी रात्री उशीरा हा अपघात झाला असून यात मृत्युमुखी पडलेले सर्व प्रवासी हे बिहारमधील आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे’, असे पोलिसांनी सांगितले.