10 अब्ज किमतीचे ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी ऑलिम्पिक खेळाडू दोषी, 25 वर्षांची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुमारे 10 अब्ज रुपये किमतीचे अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एका ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूला 25 वर्षांची शिक्षा झाली आहे. त्याच्यासोबत त्याच्या भावालाही अटक झाली आहे.

या खेळाडूचं नाव नेथन बगाले असं आहे. तो मूळचा ऑस्ट्रेलियाचा असून त्याने दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवलं आहे. तीन वर्षांपूर्वी नेथन सुमारे 10 अब्ज किमतीच्या कोकेनची विक्री करत असताना पकडला गेला होता.

2019मध्ये त्याचा भाऊ ड्रू याने एका साथीदारासोबत मिळून एका बोटीवरून 650 किलो कोकेन उचललं होतं. ऑस्ट्रेलियाच्या नेव्ही पोलिसांनी ड्रू आणि त्याच्या साथीदाराला अटक केली होती. तेव्हा या कोकेनचा माग काढताना पोलिसांना नेथन सापडला होता.

नेथनला अटकही करण्यात आली. हा खटला ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च न्यायालयातही पोहोचला. तिथे नेथन आणि ड्रूच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. ड्रूला त्या पॅकेट्समध्ये तंबाखू असल्याचं वाटलं आणि नेथनला या बाबत काहीही माहीत नसल्याचं त्यांच्या वतीने सांगण्यात आलं. मात्र, न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद अमान्य केला.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन लॉयन्स यांच्या म्हणण्यानुसार, या माजी ऑलिम्पिक खेळाडूचा ड्रग्ज तस्करीत सहभाग होता आणि या आर्थिक व्यवहारात त्याला प्रचंड नफा होणार होता. जरी त्याने आपला भाऊ या सर्वात गुंतलेला असल्याचं म्हटलं असलं तरीही खुद्द नेथनच या मागचा सूत्रधार असल्याचं दिसून आलं आहे.

या प्रकरणी नेथनला 25 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. 2007मध्येही नेथनच्या गाडीमध्ये 800 ड्रग्ज टॅबलेट सापडल्या होत्या. त्याखेरीज गांजा आणि रोकडही सापडली होती. त्या प्रकरणी त्याच्यावर 2009मध्ये खटला चालला होता. त्यानंतर 2013मध्येही त्याच्यावर सायकेडेलिक ड्रग्जच्या टॅबलेट्स बनवल्याप्रकरणी कारवाई झाली होती.