
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या महापुराचे 2005 आणि 2019 च्या महापुराशी तुलना केल्यास यंदाच्या महापुरात हा मोठा पाऊसही नाही. केवळ तीन दिवसच पाऊस पडला. जिल्ह्यातील धरण प्रकल्पातून विसर्ग नाही. तसेच, अलमट्टीमधूनही मोठा विसर्ग सुरू होता. तरीही महापूर येतोय, याचा आता विशेष अभ्यास करावा लागेल. त्यातून आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पूर पाहणीसाठी कोल्हापुरात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले, 2019च्या महापुरामधील पूरग्रस्तांना राज्य सरकार म्हणून निकषाच्या तिप्पट मदत केली होती. तशी मदत यावेळीही करण्याची मागणी लोकांकडून होत आहे. यंदाच्या महापुरानेही लोकांचे अतोनात नुकसान झाले असून, राज्य सरकारने पूरग्रस्तांना विशेषतः सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी वा छोटय़ा व्यावसायिकांना तातडीची मदत विनाविलंब करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. यंदाच्या महापुराकडे गांभीर्याने बघायला हवे. पुराचे पाणी दुष्काळी भागात वळविणे हाच एकमेव उपाय आहे, असेही ते म्हणाले.
दादा! याच मारुतीच्या साक्षीने तुम्ही शब्द दिला होता… दोन वर्षे कुठे गेला होता…
पूरस्थितीची पाहणी करून भाजपचे नेते शाहूपुरी कुंभार गल्लीतील मारुती मंदिरात पूरग्रस्तांशी संवाद साधत होते. देवेंद्र फडणवीस यांना बोलू न देता मंदिराबाहेरच थांबलेल्या एका पूरग्रस्ताने ‘साहेब मागच्या वेळेला दादा (चंद्रकांत पाटील) आले होते. त्यांनी शब्द दिला होता. मंदिरातला आमचा मारुती साक्षी आहे. त्याच्यानंतर दोन वर्षे प्रशासन कुठे गेले?, तुम्ही पण बघितले नाही. आज पण असेच आलाय… आश्वासन देणार आणि निघून जाणार… आम्ही आमच्या कामाला लागणार आणि तुम्ही तुमच्या कामाला लागणार… असे खडेबोल सुनावले.































































