
महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्माचार्य अशी ओळख निर्माण करणारे शेकापचे ज्येष्ठ नेते आबासाहेब तथा डॉ. गणपतराव देशमुख. सोलापूर जिह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघात 1962 पासून 11 वेळा निवडून येऊन 54 वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व करणारा बहाद्दर नेता. देशात दहा वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा विक्रम करुणानिधी यांनी केला. हा विक्रम मोडीत काढणारे गणपतराव एकमेव. राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्त्व वयाच्या 95व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले. साधी राहणी, उच्च विचारसरणी. कष्टकरी, शेतकरी मजूर, कामगार या वर्गासाठी अखंडपणे झटणारा लोकसेवक म्हणून त्यांची प्रतिमा अखंडपणे राहिली.
सोलापूर जिह्यातील मोहोळ पंढरपूरमधील पेनुर या गावात 1927 मध्ये त्यांचा जन्म झाला. मॅट्रिक पूर्ण केल्यानंतर पुण्यात शिक्षणासाठी आले. सांगोलासारख्या दुष्काळी भागातून आलेला हा विद्यार्थी. या काळात शंकरराव मोरे, नाना पाटील, उद्धवराव पाटील, तुळशीदास जाधव, बापू लाड, दत्ता देशमुख. यांच्या विचारांचा पगडा गणपतराव यांच्यावर पडला. त्यांच्या विचारधारेत ते सामील झाले. विधानसभेत आमदार झाल्यानंतरदेखील त्यांचा साधेपणा कायम राहिला. दुष्काळी भागातील प्रश्न त्यांनी पोटतिडकीने आणि अभ्यासूपणे मांडले. सोलापूर, सांगली, सातारा या जिह्यांतील दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. शेतकरी आणि कामगारांच्या रोजगारासाठी लढा उभारला.
महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशा महत्त्वाच्या योजना म्हणजे कापूस एकाधिकार खरेदी, शेतमालाला हमीभाव भाव आणि रोजगार हमी योजना या योजनांसाठी विधिमंडळाच्या व्यासपीठावर ज्यांनी सर्वस्व पणाला लावले त्यात गणपतराव देशमुख आघाडीवर होते. याची आठवण उभ्या महाराष्ट्राला आहे. 1972च्या भीषण दुष्काळात वसंतराव नाईक यांच्यापाठोपाठ महाराष्ट्र घुसळून कोणी काढला असेल तर तो गणपतरावांनी. रोजगार हमी योजनेच्या कामावर पुरुष आणि महिलांना समान मजुरीसाठी गणपतरावांनी विधान मंडळात आकाशपाताळ एक केले होते. समान मजुरीचा निर्णय हा पेंद्राच्या हातात होता, त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या तेव्हा हजारो महिलांना सोबत घेऊन ते इंदिराजींना भेटले आणि रोजगार हमीवर महिलांना समान मजुरीची मागणी मंजूर करून घेतली.
गणपतराव यांची प्रदीर्घ आणि विक्रमी विधिमंडळातील कारकीर्द बहुतांश काळ ही विरोधी बाकांवर गेली. 1978 मध्ये शरद पवार यांनी स्थापलेल्या पुलोद सरकारमध्ये आणि त्यानंतर 1999 मध्ये आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये मंत्री म्हणून गणपतराव देशमुख यांनी काम केले. विधिमंडळाच्या 54 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना पक्षांतराची अनेक आमिषे आली; परंतू प्रतिपूल राजकीय परिस्थितीतदेखील मंत्रिपदाची आमिषे आणि आश्वासनांना बळी न पडता शेकापसोबत कायम राहिले. शेकापचे अनेक दिग्गज नेते काँग्रेसमध्ये गेले; परंतु गणपतरावांनी पक्ष सोडला नाही. आयुष्यभर लाल बावटा खांद्यावर मिरविला. ‘एक पक्ष एक मतदारसंघ’ आणि अकरा वेळा विधानसभेत जाण्याचा विश्वविक्रम गणपतरावांच्या नावावर नोंदविला गेला. गेल्या दोन दशकांतील विधिमंडळाच्या शपथविधीसाठी बोलावल्या जाणाऱ्या अधिवेशनामध्ये सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून हंगामी अध्यक्षाची जबाबदारी गणपतराव यांच्याकडे असे.
शेतकऱ्यांना पृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खात्रीचा बाजारभाव मिळावा, रुमालाच्या खाली होणारे व्यवहार थांबवावेत यासाठी मॉडेल अॅक्ट तयार करण्यात गणपतरावांचा मोठा वाटा होता. आमदार आणि मंत्री असूनही गणपतरावांनी कधी तोरा मिरविला नाही. मुंबईला एसटीने जाणारे आणि मतदारसंघातदेखील एसटीने फिरणारे आमदार म्हणून त्यांची ओळख अखेरपर्यंत राहिली. अगदी आमदार निवासामधूनदेखील सीएसटी रेल्वे स्टेशनपर्यंत येताना विधिमंडळ सचिवालयाने व्यवस्था केलेल्या एसटीमधूनच ते जात.
2019च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. सांगोला मतदारसंघातील जनतेचा पाठिंबा असतानाही ठामपणे हा निर्णय घेतला. मतदारांनी निवृत्त करेपर्यंत पदांना चिकटून राहायचे नाही. ही भूमिका जाहीरपणे त्यांनी लोकांपुढे मांडली आणि निवृत्ती घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रदीर्घ कारकीर्द, राजकीय चढ-उतार, पक्ष, स्थित्यंतर आणि अनेक मुख्यमंत्री यांची कारकीर्द अनुभवलेला, लोकशाहीच्या इतिहासाने दखल घेतलेला, पुरोगामित्वाचा आवाज बुलंद करणारा, नव्वदीतही तरुणांना लाजवणारा, अभ्यासपूर्ण नेतृत्वाने सभागृहाला स्तब्ध करणारा, पश्चिम महाराष्ट्रासारख्या प्रस्थापितांच्या राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करून दिशा देणारा पुरोगामी विचारांचा आवाज गणपतराव देशमुख यांच्या जाण्याने निःशब्द झाला आहे.
- विठ्ठल जाधव





























































