
नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरण ओव्हरफ्लोच्या दिशेने जात असून, दुसऱया महत्त्वपूर्ण असलेल्या निळवंडे धरणाने आज 50 टक्क्यांची पातळी गाठली आहे. तर, भंडारदरा धरण 83 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तांत्रिक कारणांमुळे भंडारदरा धरणाची पाणीपातळी 83 टक्क्यांपर्यंत स्थिर ठेवण्यात आली असल्याने उर्वरित पाणी निळवंडे धरणात सोडण्यात येत आहे.
गेल्या सात-आठ दिवसांपासून भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत होता. दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही धरणात पाण्याची आवक चांगली आहे. आता पुन्हा पाऊस जोर धरेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. भंडारदरा धरण हे साधारणपणे 15 ऑगस्टदरम्यान पूर्ण क्षमतेने भरत असल्याचा इतिहास आहे. त्यामुळे हे धरण 15 ऑगस्टपर्यंत नक्कीच भरेल, असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अधिकाऱयांना आहे.
भंडारदरा धरणातून अंब्रेला फॉल या मोरीमधून पाणी सोडण्यात येत आहे. तसेच विद्युत निर्मितीसाठी पाणी सोडण्यात येत असल्याने हे पाणी निळवंडे धरणात साठवले जात आहे. यासह कृष्णावंती नदीचे उगमस्थान असणाऱया कळसूबाई डोंगररांगांमध्येही पाऊस चांगला झाल्याने वाकी जलाशय ओव्हरफ्लो झाला असून, त्याचे पाणीही निळवंडे धरणात येत आहे. आता येथील पाऊस मंदावला असला, तरी थोडय़ाफार प्रमाणात हे पाणी निळवंडे धरणात येत आहे. त्यामुळे निळवंडे धरणाची पाणीपातळी 50 टक्क्यांपर्यंत पोहोचलेली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुन्हा पावसाने जोर धरला तर लवकरच ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरतील.
भंडारदरा आणि निळवंडे धरण हे नगर जिल्ह्यात पर्यटकांसाठी मोठे आकर्षणाचे केंद्र आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी या दोन्ही स्थळांना भेट देण्यासाठी पर्यटक मोठय़ा संख्येने गर्दी करत आहेत.



























































