लव्हलिनाच्या पदकाचा रंग कोणता? उपांत्य लढतीत आज जगज्जेत्या सुरमेनेलीचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची महिला बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन हिने टोकियो ऑलिम्पिकमधील आपले पदक निश्चित केले आहे. मात्र तिच्या पदकाचा रंग कोणता हे अद्यापि निश्चित झालेले नाही. मला सुवर्ण पदक जिंकायचेय, असा निर्धार लव्हलिना बोर्गोहेनने बोलून दाखविलेला आहे. उद्या बुधवारी उपांत्य फेरीत तिच्यापुढे विद्यमान जगज्जेती असललेल्या तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेली हिचे आव्हान असणार आहे. या लढतीत विजय मिळाल्यास ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी लव्हलिना बोर्गोहेन हिंदुस्थानी पहिली बॉक्सर ठरणार आहे.

आसामची 23 वर्षीय लव्हलिना बोर्गोहेन इतिहास घडवण्याच्या उंबरठय़ावर आहे. कारण याआधी हिंदुस्थानला बॉक्सिंगमध्ये विजेंदर सिंग 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये आणि महिला बॉक्सर मेरी कोम हिने 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकले होते. त्यामुळे लव्हलिना बोर्गोहेनने बुधवारची उपांत्य लढत जिंकून अंतिम फेरी गाठल्यास ती हिंदुस्थानच्या बॉक्सिंग इतिहासातील ऐतिहासिक कामगिरी ठरणार आहे.

पदक तर फक्त गोल्ड असते!

उपांत्य फेरी गाठलेल्या लव्हलिना बोर्गोहेनला सध्या सुवर्ण पदकाचे वेध लागले आहेत. हिंदुस्थानसाठी किमान कास्य पदक निश्चित केल्यानंतर लव्हलिना बोर्गोहेनने उपांत्य लढतीपूर्वी बोलताना ‘‘पदक तर फक्त गोल्ड असते. ते आधी मला मिळवू द्या,’’ अशी आत्मविश्वासात्मक प्रतिक्रिया दिली. मात्र उपांत्य लढतीत लव्हलिना बोर्गोहेनला ज्या बुसेनाज सुरमेनेलीविरुद्ध भिडायचे आहे तिने या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. मात्र लव्हलिना बोर्गोहेननेही गेल्या लढतीत तैपईच्या माजी जगज्जेत्या नीन चिन चेन हिला धूळ चारलेली आहे. त्यामुळे लव्हलिना बोर्गोहेन-बुसेनाज सुरमेनेली यांच्यातील लढतीकडे तमाम बॉक्सिंगप्रेमींच्या नजरा असतील.