
सर्वसामान्य माणूस स्वसंरक्षणासाठी घरात एखादी पिस्तूल किंवा फायतर रायफल ठेवतो. मात्र, एका व्यक्तीने घरातच क्षेपणास्त्रे, दारुगोळा आणि लष्कराचा रणगाडाही स्वतःच्या घरात लपवून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. हा शस्त्रसाठा ठेवण्यासाठी त्याने घरातच एक बंकर बनवल्याचेही उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे हा सर्व शस्त्रसाठा दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील आहे. जर्मनीत हा शस्त्रसाठी घरात बाळगळ्याप्रकरणी त्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात दंड भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच त्याला तुरुंगवासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
जर्मनीतील सेवानिवृत्त ब्रोकर क्लॉस डायटर फ्लिक हाएकेनडोर्फ शहरात राहतात. त्यांनी आपल्या घरातच एक बंकर बनवला होता. त्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा लपवून ठेवला होता. फ्लिक यांना जुन्या शस्त्रांची आवड असल्याने त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील अनेक शस्त्रास्त्रे आपल्या घरातील बंकरमध्ये लपवून ठेवली होती. जुनी शस्त्रे मिळवण्यासाठी कितीही खर्च करण्याची त्यांची तयारी होती. हा शस्त्रसाठा जमवण्यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केल्याची माहिती मिळाली आहे.
फ्लिक यांच्या बंकरमध्ये जर्मनीच्या नाझी काळातील अनेक शस्त्रास्त्रे आहेत. त्यात रणगाडे, कॅनन,टोरपेडो क्षेपणास्त्र, 70 रायफल आणि 2000 राऊंड एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे शस्त्रसाठा आढळला आहे. त्यांच्या घरात रणगाडा आढळल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा रणगाडा आपण ब्रिटनकडून 1977 मध्ये खरेदी केल्याचे फ्लिक यांनी वकिलांना सांगितले. तसेच 25 लाख रुपये खर्च करून आपण याचे इंजिनही दुरुस्त केले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.
आपल्याला जुन्या शस्त्रांची आवड असल्यानेच आपण हा शस्त्रसाठा जमवल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. हा शस्त्रसाठा घरात ठेवल्याने शस्त्रास्त्रविरोधी कायद्याचे उललंघन केल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. या प्रकरणी त्यांना दोन लाख पाउंड ( सुमारे दोन कोटी रुपयांचा) दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच त्यांना 14 महिन्यांच्या तुरुंगवासाचाही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
फ्लिक यांनी घरात दुसऱ्या महायुद्धातील मोठ्या प्रमाणातील शस्त्रसाठा लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. त्यात त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणातील शस्त्रसाठा आढळून आला आहे. फ्लिक यांनी 70च्या दशकात ब्रिटनकडून रणगाडा विकत घेतला होता. त्याची दुरुस्ती करून ते त्यातून शहरात फिरत होते. त्यावेळी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती, अशी माहिती तत्कालीन महापौरांनी दिली.
पोलिसांनी फ्लिक यांच्या घरी छापा टाकल्यावर नाझी काळातील अनेक मूर्ती त्यांनी त्यांच्या बगीच्यात सजावटीसाठी ठेवल्याचे आढळून आले. हा शस्त्रसाठा आणि या दुर्मिळ वस्तू विकण्यासाठी ते नेहमी ग्राहकांच्या शोधात होते, अशी माहितीही मिळाली आहे. फ्लिक यांच्याकडे नाझी काळातील गणवेषही आढळला आहे. जर्मनीत नाझी काळातील वस्तू प्रदर्शनासाठी ठेवणे आणि त्या दाखवणे हा गुन्हा आहे. त्यामुळे फ्लिक यांना मोठ्या प्रमाणात दंड आकारून तुरुंगवासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.


























































