बिग बॉसच्या घराला कार्निव्हल लूक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बिग बॉस’चा 15वा सिझन रविवारपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. टीव्हीच्या सहा आठवडे आधी हा शो वूटवर पाहता येणार आहे. ‘बिग बॉस’च्या घराबाबत सगळ्यांनाच उत्सुकता असते. यंदा बिग बॉसच्या घराला बोहेमियन लूक देण्यात आला आहे. आर्ट डायरेक्टर ओमंग कुमार आणि प्रॉडक्शन डिझायनर वनिता कुमार यांनी हे घर साकारले आहे.

याबाबत ओमंग कुमार म्हणाले, ‘‘यंदाच्या बिग बॉस ओटीटी हाऊससाठी आम्ही बोहेमियन, जिप्सी जीवनशैलीसारखा स्वच्छंदी आणि एखाद्या कार्निव्हलसारखा मौजमजेचा लूक निवडला आहे. हे घर व्हेकेश होमसारखेही दिसायला हवे असा आमचा प्रयत्न होता, ज्यामुळे स्पर्धकांना इथे खूप काळ राहण्याची इच्छा व्हायला हवी. घराचा लूक काहीसा हटके, आरामदायी, उत्साही पण समकालीन आहे. अनेक प्रिंट्स व रिबिन्सने घराला आकर्षकरित्या सजवले आहे.’’

घरातील बेडरूममध्ये आरामदायी आणि उबदार बंक बेड्स असतील. जणूकाही एखाद्या कॅम्पिंगवर आल्याचा फील स्पर्धकांना येईल. किचन विविध रंगांनी रंगवलेले आहे तर बेडरूम एखाद्या तंबूसारखे आहे, ज्यातल्या भिंती बांबू आणि फुलाफुलांच्या डिझाईन्सनी रंगविल्या आहेत. घराच्या दिवाणखाण्याच्या मध्यभागी एक महाकाय डोळा आहे, इथूनच करण जोहर घरातल्या सदस्यांवर लक्ष ठेवणार आहे.

यांच्या नावाची होतेय चर्चा

बिग बॉसच्या घरात दहा सेलिब्रेटी एंट्री घेणार आहेत. यात नेहा भसीन, जिशान खान आणि राकेश बापट यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. याशिवाय करण नाथ, शमिता शेट्टी, रिद्धिमा पंडित, दिव्या अग्रवाल, उर्फी जावेद, अक्षरा सिंह, नेहा मलिक, पवित्रा लक्ष्मी आदी सेलिब्रेटींची नावे चर्चेत आहेत.