कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोच्या भुयारीकरणाचा 40 वा टप्पा पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरील मेट्रो-3 प्रकल्पाच्या भुयारीकरणाचा 40 वा टप्पा पूर्ण झाला. 325 दिवसांपूर्वी सायन्स म्युझियम स्थानकातून भुयारीकरण करत निघालेली रॉबिन्स बनावटीची ‘तानसा-1’ ही टनेल बोअरिंग मशीन आज महालक्ष्मी स्थानकात यशस्वीरीत्या पोहोचली. हा डाऊन-लाईन मार्ग 1135 मीटर लांबीचा होता. 757 रिंग्सच्या सहाय्याने हे भुयारीकरण झाले.

मेट्रो-3 मार्गावरील सायन्स म्युझियम स्थानक ते महालक्ष्मी स्थानक हा टप्पा आव्हानात्मक होता. या मार्गासाठी पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी ते लोअर परेल दरम्यानच्या रेल्वेमार्गाखालून भुयारीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हे भुयार जेकब सर्कल येथे महानगरपालिकेच्या 17 फूट खोलवर असलेल्या भूमिगत कंपिंग स्टेशनजवळून गेले आहे. हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱया टीमचे मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांनी अभिनंदन केले. मेट्रो-3 च्या पॅकेज-5 मधील हा महत्त्वाचा टप्पा होता. पॅकेज-5 हा मेट्रो-3 मधील सर्वाधिक लांबीचा मार्ग आहे. या पॅकेजमधील भुयारीकरणाचे चार टप्पे आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. मेट्रो-3 चे आतापर्यंत 53 किलोमीटर म्हणजेच 97 टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे.