छोटय़ा विनूची मोठी कहाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> एकनाथ आव्हाड

मराठी बालसाहित्यात बालकथा, बालकवितांच्या मानाने बालकादंबऱया या संख्यात्मक आणि त्यातही गुणात्मक  तशा कमीच आहेत. एकतर बालकादंबरीचे अवकाश इतर बालसाहित्य प्रकाराच्या अनुषंगाने तसे मोठेच. बालकादंबरीचे कथानक, पात्र – विचार, कादंबरीची कथनशैली व भाषाविचार यात महत्त्वाचा असतो. पण हे मोठे अवकाश छोटय़ा मुलांना पेलवणारे हवे. त्यातला विषय-आशय मुलांच्या भावजीवनाशी निगडित हवा. हा विचार लेखनाच्या मुळाशी असला की, बालकादंबरीचे झाड नक्कीच बहरून येते. अशी कादंबरी मुलांची वाचनाची गोडी तर वाढवतेच शिवाय नकळत चांगला विचार त्यांच्या मनात रुजविण्याचे कामही ती करते. अशाच वाटेने जाणारी बालसाहित्यिक संजय वाघ यांची ‘जोकर बनला किंगमेकर’ ही बालकादंबरी माझ्या वाचण्यात आली.

संजय वाघ हे मुलांची मने उत्तम वाचतात म्हणूनच मुलांचं भावविश्व शब्दांतून अलगदपणे रेखाटणं त्यांना सहजसाध्य होतं. याची साक्ष ही कादंबरी आपल्याला देते.

असं म्हणतात, संकटं आली की ती चोहोबाजूने येतात.  विनूच्या बाबतीतही तेच घडते. वडिलांचे कृपाछत्र अकाली हरपते. वडिलांच्या आठवणीने व्याकूळ झालेला विनू काही दिवसांनी स्मशानात जाऊ लागतो. वडिलांवर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केलेले असतात त्या ठिकाणी जाऊन रडतो, मन मोकळे करतो. ते दृश्य बघून गावकरी विनूला भुताने पछाडल्याची अफवा गावात पसरवितात. मित्रांसह शेजारीही त्याच्याकडे पाठ फिरवितात. घरातल्या घरात त्याची घुसमट होऊ लागते.  यातून मुलाची सोडवणूक करण्यासाठी मग आई छोटय़ा विनूला गावापासून दूर सर्कशीत पाठवते. माय- लेकराची ताटातूट होते. आईचा शब्द प्रमाण मानणारा विनू सर्कशीत जातो खरा, पण आपल्या अंगभूत कलागुणांमुळे आणि चांगुलपणामुळे लवकरच तो अनेकांचा चाहता होतो.   त्यातच एक संधी त्याच्याकडे चालून येते. आलेल्या संधीचे आपल्या परिश्रमाने सोने कसे करायचे ते विनूकडून शिकावे.   ही बालकादंबरी योग्य वयात मुलांच्या मनात रुजविण्याचा कळत-नकळत प्रामाणिक प्रयत्न करते हे विशेष.

खरेतर मुले सभोवताली वावरताना जे पाहतात, ऐकतात आणि अनुभवतात त्याचा त्यांच्या मनावर जबरदस्त पगडा असतो. या गोष्टी त्यांच्या बालमनावर परिणाम करीत असतात. असेच छोटय़ा विनूच्या बाबतीतही होते. या बालकादंबरीचा नायक विनू शरीराने बुटका, पण या व्यंगाचे दुःख न कुरवाळता त्यावर मात करून, लहान वयात येणारे आघात पचवून, समाजासाठी चांगलं, आदर्शवत काही करण्यासाठी मनःपूर्वक धडपडतो. कुढत न बसता तो धडपडत, मार्ग काढत पुढे जातो. धावत्याला रस्ता सापडे, असे आपण म्हणतो, पण हे आपल्या कृतीतून विनू दाखवून देतो. तल्लख बुद्धिमत्तेचा, अभिनयाची आवड असणारा, प्रसंगावधान दाखवणारा, अनेकांच्या मदतीला धावून जाणारा, कनवाळू वृत्तीचा आणि मातृत्वभक्तीचा विनू मुलांना नक्की आपला मित्र वाटेल. या कादंबरीचे कथानक आणि त्यातील नायक लेखक संजय वाघ यांनी शब्द संवादातून सहजपणे उभे केला आहे, कथानकात प्राण फुंकले आहेत. पात्र विचार आणि कादंबरीची कथनशैली यातून कादंबरी छान फुलून आली आहे.

किशोर-कुमार वयोगटातील मुले पौगंडावस्थेत असतात. त्यांच्या कोवळ्या व संवेदनशील मनावर जे ठसविले जाते त्याची प्रतिमा त्यांच्या मनात कायम घर करून राहते. म्हणूनच अशा वयोगटातील मुलांचा विचार करून त्यांच्यासाठी लिहिलेले साहित्य त्यांना पुढे  समाजात खंबीरपणे जगण्याचे बळ देते.

जोकर बनला किंगमेकर

लेखक ः संजय वाघ

प्रकाशक ः प्राजक्ता प्रकाशन, नाशिक

पृष्ठs ः 84, मूल्य ः रुपये 130/-