सायोनारा टोकियो… आता भेटू पॅरीसमध्ये!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोकियो ऑलिम्पिकची सांगता रविवारी दिमाखदार सोहळ्याने झाली. आकर्षक रोषणाईने क्रीडागाव न्हाऊन निघाले होते. कोरोनासारख्या संसर्गावर मात करीत जपानने जागतिक स्तरावरील प्रतिष्ठsचा क्रीडा महोत्सव यशस्वी करून दाखवला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाक यांनी टोकियो ऑलिम्पिक संपल्याची घोषणा केली. याप्रसंगी ‘थँक यू आणि सायोनारा टोकियो’ आणि ‘विल सी यू ऑल इन दी पॅरीस’ असे संबोधत 2024 सालातील ऑलिम्पिकचा बिगूलही वाजवण्यात आला.

ऑलिम्पिकच्या सांगता सोहळ्याची सुरुवात आतिषबाजीने करण्यात आली. व्यासपीठावर जपानचा झेंडा आणण्यात आला. त्यानंतर स्टेडियममध्ये सर्व देशांचे झेंडे गोलाच्या रूपात दाखवण्यात आले. टोकियोचे गर्व्हनर युरिको कोईके व थॉमस बाक यांनी ऑलिम्पिक ध्वज पॅरीसचे मेयर एनी हिडाल्गो यांच्याकडे सुपूर्द केला. याचप्रसंगी पॅरीस येथील आयफेल टॉवर येथे ऑलिम्पिक ध्वजही फडकण्यात आला.

कास्य पदक विजेता बजरंग हिंदुस्थानी दलाचा प्रमुख

ऑलिम्पिक सांगता सोहळ्यात हिंदुस्थानी दलाच्या प्रमुख पदाची जबाबदारी कुस्तीमध्ये कास्य पदक जिंकलेल्या बजरंग पुनियाकडे सोपवण्यात आली होती. या सोहळ्यात प्रत्येक देशाचा समूह एकत्रितपणे पुढे पाऊल टाकत होता. प्रत्येक खेळाडू हा क्षण एंजॉय करीत होता हे विशेष.