
>>नवनाथ शिंदे
पुणे -ग्रामीण पोलीस दलातील खमक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकामुळे (एलसीबी) जिल्ह्यात गुन्ह्यांची तातडीने उकल होण्यास मदत झाली आहे. घटनांचे तांत्रिक विश्लेषण, खबऱ्यांचे नेटवर्क, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगांरावर बारीक नजरेसह सीसीटीव्हींच्या फूटेजद्वारे गुन्हा उघडकीस आणला जात आहे. विशेषतः लोणावळ्यातील डॉक्टर दाम्पत्यांच्या घरावरील दरोडा, पुणे-मुंबई महामार्गावर लूट करणारी टोळी आणि पाटस टोलनाक्याजवळ एसटी बस लुटीचा तपास वेगाने करण्यात आला. त्याद्वारे विविध गुन्ह्यातील आरोपींना राज्याबाहेरूनही अटक करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी प्राधान्य दिले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकचालकांना अडवून लूटमार करणारी टोळी सक्रिय होती. त्याशिवाय कामशेत परिसरातील ताजे येथील एका पेट्रोल पंपावर ट्रकचालकांना धमकावत चोरट्यांनी 70 हजारांची रोकड लुटली होती. द्रुतगती मार्गावर ट्रकचालकांना अडवून लूटमारीच्या घटना वाढीस लागल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाकडून चोरट्यांचा माग काढण्यात आला. खालापूर परिसरातील चोरट्यांनी लूटमारीचे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी मोरबेवाडी परिसरात सापळा रचून संतोष वाघमारेला अटक केली. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने लूटमारीचे पाच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
लोणावळ्यातील नामांकित डॉ. हिरालाल खंडेलवाल (वय 73) यांच्या घरात 17 जूनला मध्यरात्रीच्या सुमारास खिडकीद्वारे प्रवेश करून चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत डॉक्टर दाम्पत्याचे हातपाय बांधून दरोडा टाकला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला गती देत मुंबईसह मध्यप्रदेशातून 15 जणांना अटक केली. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, मोबाईल फोन असा 30 लाख 52 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे मुंबईतून 8 जणांना अटक केली होती. त्यानंतर मुख्य आरोपी हेमंत कुसवाह मध्यप्रदेशात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने आरोपींच्या शोधात तीन आठवडे मध्यप्रदेशात तळ ठोकत तपासाला गती दिली. मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील विविध ठिकाणी तपास करुन मुख्य आरोपी हेमंत कुसवाहसह 5 जण आणि दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले.
हॉटेल व्यवसायात बुडाल्यामुळे एसटी चालकाला पाटस टोल नाक्याजवळ अडवून पोलीस असल्याची बतावणी करत टोळक्याने चौघांची 1 कोटी 55 लाखांची रोकड लुटून नेली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. याप्रकरणी पथकाने तपासाला गती दिली होती. सीसीटीव्ही फूटेजमध्ये पाटस टोलनाक्यापासून चार किलोमीटर अंतरावर एकजण एसटीतून खाली उतरून पळाल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे संशयाची पाल मनात चुकचुकल्याने पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले होते. चोरट्यांनी लूट केल्यानंतर अवघ्या 72 तासांमध्ये पथकाने त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी रक्कम खर्च करण्याआधी त्यांच्याकडून गुन्ह्यातील 1 कोटी 55 हजारांचा ऐवज परत मिळविण्यात आल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस उपनिरीक्षक राम धोंडगे, शब्बीर पठाण, राजू मोमीण, जर्नादन शेळके, अनिक काळे, रविराज कोकरे, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, विजय कांचन, गुरू जाधव, धीरज जाधव, बाळासाहेब खडके, दगडू विरकर, काशीनाथ राजापुरे पथकामध्ये कार्यरत आहेत.
पुणे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. विशेषतः प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कुंडली तपासणे, हद्दीतील बारीक-सारीक घटनांवर लक्ष ठेवणे, गुन्हेगारी कमी करण्यासाठी ठाणेप्रमुखांना सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय गुन्ह्यांची उकल करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणकडूनही चांगली कामगिरी केली जात आहे.
– डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण
































































