
समुद्र ही आपली सर्वांची सामायिक संपत्ती आहे. मुळात सागरी मार्ग हे आंतरराष्ट्रीय व्यापाराची जीवनवाहिनी, परंतु आज या संपत्तीला अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. सागरी मार्गांचा पायरसी आणि दहशतवादासाठी दुरुपयेग केला जात आहे, अशी चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत व्यक्त केली. हिंदुस्थानकडे पहिल्यांदाच या परिषदेचे अध्यक्षपद आले असून त्यानिमित्ताने बोलताना मोदींनी सागरी सुरक्षेवर हे मत मांडले.
Chairing the UNSC High-Level Open Debate on “Enhancing Maritime Security: A Case For International Cooperation”. https://t.co/cG5EgQNENA
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2021
पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चासत्रात सहभागी झाले. यावेळी त्यांनी सागरी सुरक्षेसंबंधी पाच मूळ सिद्धांत मांडले. अनेक देशांमध्ये सागरी हद्दीवरून वाद सुरू आहे. अशा प्रकारच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपापसात सामंजस्य व सहकार्याची भावना तयार केली पाहिजे. हे फ्रेमवर्क कुठलाही एकटा देश बनवू शकत नाही, सामूहिक प्रयत्नांतूनच हे शक्य असल्याचे मोदींनी नमूद केले. समुद्र आपल्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. परंतु, आज समुद्राला जलवायू परिवर्तन आणि नैसर्गिक आपत्तींनाही तोंड द्यावे लागत असल्याचे मोदी म्हणाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चासत्रात सागरी सुरक्षा तसेच सागरी गुन्हेगारीच्या विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. तसेच अनेक ठरावही मंजूर केले आहेत. सागरी सुरक्षेवर उच्चस्तरीय आणि खुली सखोल चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
चर्चेचे अध्यक्षपद भूषविणारे मोदी पहिले हिंदुस्थानी पंतप्रधान
हिंदुस्थान ऑगस्ट महिन्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहे. 1 ऑगस्टपासून हिंदुस्थानकडे या पदाची जबाबदारी आली आहे. परिषदेमध्ये अमेरिका, चीन, ब्रिटन, रशिया आणि फ्रान्स हे केवळ पाच कायमस्वरुपी सदस्य आहेत, तर हिंदुस्थान दोन वर्षांसाठी या परिषदेचा अस्थायी सदस्य आहे. परिषदेच्या चर्चासत्राचे अध्यक्षपद भूषविणारे नरेंद्र मोदी हे पहिले हिंदुस्थानी पंतप्रधान ठरले आहेत.
मोदींनी मांडलेले पाच सिद्धांत
- वैध सागरी व्यापारातील अडथळे दूर केले पाहिजेत.
- सागरी हद्दीवरून देशादेशांमध्ये सुरू असलेल्या वादांवर शांततेने तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यांना धरून तोडगा काढला पाहिजे.
- नैसर्गिक आपत्ती तसेच सागरी धोक्यांचा आपण सर्वांनी एकजुटीने सामना केला पाहिजे.
- आपल्याला सागरी पर्यावरण आणि संसाधनाचे जतन करायला हवे.
- तसेच जबाबदार सागरी कनेक्टिव्हीटीला प्रोत्साहन दिले पाहिजे.

























































