
राज्यांना ओबीसी आरक्षण देण्याचा अधिकार देणारे 127 वे घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग आता मोकळा होणार आहे. बुधवारी राज्यसभेत हे विधेयक मांडले जाईल. तेथे मंजुरी मिळाली की राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. विधेयकाच्या मंजुरीमुळे मागास प्रवर्ग ठरविण्याचे अधिकार आता राज्यांना मिळणार आहेत. मराठा आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरच केंद्र सरकारला हे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत आणावे लागले.
लोकसभेत आज दिवसभर 127 व्या घटना दुरुस्ती विधेयकावर चर्चा झाली. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शविला. 102 वी घटना दुरुस्तीला काँग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यामुळे या विधेयकाच्या निमित्ताने सरकारला नैतिकतेचे धडे शिकवायचा काँग्रेसला कोणताही अधिकार नाही, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्रकुमार यांनी केली. काँग्रेसचे गटनेते अधिररंजन चौधरी यांनी या विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. मात्र, सरकारची नियत साफ दिसत नाही, असा टोलाही लगावला. आम आदमी पार्टीच्या भगवंतसिंग मान यांनी कृषी कायदे रद्द करून ओबीसी आरक्षण विधेयकाचा आनंद सरकारने द्विगुणित करावा, अशी मागणी केली. झारखंड मुक्ती मोर्चाचे विजयकुमार हंसदाक यांनी या विधेयकाला पाठिंबा देताना, खासगीकरणामुळे आरक्षण धोक्यात आल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ओबीसी आरक्षणावरून केंद्र सरकारवर द्रमुकच्या दयानिधी मारन यांनी चांगलीच टोलेबाजी केली. उत्तर प्रदेशच्या निवडणुका तोंडावर असल्याने मोदी सरकारला ओबीसींचा पुळका आला आहे, अशी टीका त्यांनी केली. यूपीच्या निवडणुका सातत्याने होत राहव्यात जेणेकरून ओबीसींच्या पदरात काही तरी पडत राहील, असा टोलाही त्यांनी लगावला. आरएलपीच्या हनुमान बेनिवाल यांनीही या विधेयकाला पाठिंबा दिला. अपना दलाच्या नेत्या व केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी या विधेयकाला पाठिंबा देतानाच ओबीसी जनगणनेची मागणीही लागलीच करून टाकली. फक्त मराठा आरक्षणाचीच चर्चा कशासाठी आहे, मुस्लिम आरक्षणाची चर्चा का होत नाही, असा सवाल करत एमआयएमच्या असाउद्दीन ओविसी यांनी सरकारला ओबीसींबद्दल प्रेम नाही तर त्यांच्या मतावर प्रेम आहे, अशी टीका केली. अकाली दलाच्या हरसिमरत काwर बादल यांनीही या विधेयकाचे समर्थन केले. नॅशनल कॉन्फरन्सच्या हुसेनन मुसैदी यांनी मोदी सरकारने जाणीवपूर्वक जम्मू-कश्मीरचे विभाजन केल्याचा आरोप करत या विधेयकाला पाठिंबा दिला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महंमद आरीफ यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. उत्तर प्रदेशच्या निवडणुका नसत्या तर केंद्र सकरारने हे विधेयकही आणले नसते, असा टोला त्यांनी लगावला.
पंतप्रधान भाजपा खासदारांवर नाराज
राज्यसभेत महत्त्वाच्या विधेयकावेळी दांडी मारणाऱया खासदारांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपा खासदारांच्या साप्ताहिक बैठकीत बोलताना पंतप्रधानांनी खासदारांच्या बेजबाबदार वर्तनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनाही कानपिचक्या दिल्या. उज्ज्वला योजनेसह जनतेशी नाळ जोडलेल्या सरकारी योजना खासदारांनी मतदारांपर्यंत पोहचवाव्या, अशी सूचनाही पंतप्रधानांनी यावेळी केली.
– लोकसभेत आज दिवसभर झालेल्या चर्चेनंतर या विधेयकावर मतदान घेण्यात आले. विधेयकाच्या बाजून 386 तर विरोधात 0 मते मिळाली. लोकसभेने आज मंजुरी दिल्यानंतर हे विधेयक उद्या राज्यसभेत मांडले जाईल. एसईबीसीचे नवे प्रवर्ग तयार करण्याचे अधिकार या नव्या विधेयकामुळे राज्यांना मिळणार आहेत. आज त्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल पडले.
हे विधेयक म्हणजे रिकामे ताट व नुसताच थाटमाट
एखाद्याला जेवण्यासाठी बोलवायचे ताट-पाट मांडायचे. सगळा थाट करायचा आणि ताटात काहीच वाढायचे नाही, असा प्रकार या विधेयकाच्या निमित्ताने सरकारने केला आहे, अशी टीका शिवसेनेने लोकसभेत केली. शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांनी या विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. पेंद्राच्या दिरंगाईमुळेच मराठा आरक्षण रद्द झाले, असा आरोप करत त्यांनी, सगळी सत्ता पेंद्राकडेच असावी, या अट्टहासापोटी 102 वी घटना दुरुस्ती करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर 105 वी घटनादुरुस्ती करण्यात आली. मात्र, यामुळे काय हशील झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या विधेयकामुळे राज्यांना खरोखरच अधिकार मिळणार आहेत काय, असा सवाल करत आगीतून फुफाटय़ात, अशी स्थिती निर्माण होऊ नये, अशी अपेक्षाही खासदार राऊत यांनी बोलून दाखविली. त्याचवेळी शिवसेना या विधेयकाचे समर्थन करत असल्याचेही त्यांनी सांगितले.




























































