अकरावीची सीईटी रद्द, उच्च न्यायालयाचा आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-highcourt

कोविड अद्यापही पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. शिवाय विद्यार्थ्यांचे लसीकरणही अपूर्णच आहे. अशा स्थितीत अकरावीची सीईटी घेऊ नये, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रमेश धनुका यांच्या खंडपीठाने दिले. दहावी निकालाच्या आधारावरच विद्यार्थ्यांना अकरावीला सहा आठवडय़ांत प्रवेश द्या, असेही खंडपीठाने राज्य सरकारला बजावले.

एसएससी, सीबीएसई, आयसीएसईसह इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी शासनाने सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून तशी अधिसूचना 28 मे रोजी काढली आहे. मात्र या निर्णयाला आक्षेप घेत दादरच्या आयईएस ओरियन या शाळेतील विद्यार्थिनी अनन्या पत्की हिने मुंबई उच्च न्यायालयात अॅड. योगेश पत्की यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर राखून ठेवलेला निकाल न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने आज जाहीर केला.

…तर आम्हीच सुमोटो याचिका दाखल केली असती

निकाल सुनावताना न्यायालयाने स्पष्ट केले की, अकरावीसाठी सीईटी घेण्यासंदर्भात कायद्यात कोणतीही तरतूद नाही. शासनाने अचानक सीईटीची घोषणा केली. मात्र विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय पाहता जर ही याचिका आमच्यापुढे आली नसती तर आम्हीच सुमोटो याचिका दाखल करत याची दखल घेतली असती, असे न्यायमूर्ती म्हणाले. दरम्यान, या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी स्थगिती देण्याची विनंती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केली, मात्र न्यायमूर्तींनी सरकारची ही मागणी फेटाळून लावत दिलासा देण्यास नकार दिला.