बीएचआर घोटाळा, मुख्य आरोपी सुनील झंवरला अटक; गिरीश महाजनांच्या अडचणीत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीएचआर मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेमधील कोटय़वधींच्या घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर याला पकडण्यात पोलिसांना आज अखेर यश आले. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याला नाशिकच्या पंचवटीतून ताब्यात घेतले आहे.

जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल आहे. मुख्य संशयित असलेला सुनील देवकीनंदन झंवर हा गेल्या काही महिन्यांपासून फरार होता. तो नाशिकला आल्याची माहिती कळताच पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पथक काल रात्रीच नाशिकला पोहोचले. त्यांनी सापळा रचून पंचवटीतून त्याला आज सकाळी अटक केली, याबाबतची नोंद पंचवटी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्याच्या अटकेमुळे या घोटाळ्यातील सर्वच बाबींचा उलगडा होण्यास मदत होणार आहे.

महाजनांची अटक अटळ; वकिलांचा दावा

भाजप आमदार गिरीश महाजन यांची अटक अटळ असल्याचा दावा अॅड. विजय भास्करराव पाटील यांनी केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास झाल्यास गिरीश महाजन यांना निश्चितच बेडय़ा पडणार असल्याचे अॅड. पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले. 20 वर्षांपूर्वी सुनील झंवर हा आरटीओ एजंट होता. सध्या तो किमान पाच हजार कोटींचा मालक आहे. एवढी संपत्ती या झंवरकडे कशी आली? कोण आहे झंवरचा गॉडफादर? असा सवाल अॅड. विजय पाटील यांनी केला. पतसंस्थेत असलेले सॉफ्टवेअर आणि झंवर याच्याकडचे सॉफ्टवेअर एकच होते. सर्व कर्जदारांच्या मिळकतीची झंवरला माहिती होती. त्याने कवडीमोल भावात पतसंस्थेच्या मालमत्ता खरेदी केल्या. हा सारा गैरव्यवहार गिरीश महाजन यांच्या छत्रछायेखाली झाल्याचा आरोप अॅड. पाटील यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांनीही झंवरने नाशिकमध्ये खरेदी केलेल्या मालमत्तांचे व्यवहार थांबविण्याची मागणी केली आहे.