पावसाळी आजारांचा धोका कायम!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी पावसाळी आजारांचा धोका मात्र कायम असल्याचे समोर आले आहे.  ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठ दिवसांत मुंबईत मलेरियाचे तब्बल 201, डेंग्यूचे 32, लेप्टोचे 15, गॅस्ट्रो 86, हिपेटायटिस 7 आणि ‘एच1एन1’चे 5 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यक खबरदारी घेऊन तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

फेब्रुवारीच्या मध्यावर आलेली कोरोनाची दुसरी लाट आता पूर्ण नियंत्रणात आली आहे. मात्र जुलैपासून डेंग्यू, मलेरियासह पावसाळी आजारांनी डोके वर काढले आहे. पावसाळी आजारांमध्ये जूनच्या तुलनेत जुलैमध्ये सुमारे दुप्पट वाढ झाली होती. ही रुग्णवाढ कायम असल्याने खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जुलैपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डासांचे प्रमाण वाढून या आजारांच्या प्रसार वाढल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी  घर आणि परिसरात पाणी साचू देऊ नये, परिसर स्वच्छ ठेवावा आणि सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास पालिका रुग्णालये पिंवा नजीकच्या डॉक्टरशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. पावसाळी आजारांवर उपचार करण्यासाठी पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये, दवाखान्यांमध्ये आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

400 नमुने जमल्यावर ‘डेल्टा प्लस’ चाचणी

n राज्यात डेल्टा प्लसचा धोकाही वाढत असल्याचे समोर आले आहे. डेल्टा प्लसच्या वेगाने प्रसाराच्या स्ट्रेनमुळे प्रशासनाचे आव्हान वाढले आहे. बुधवारी राज्य सरकारने जाहीर केलेल्या अहवालानुसार मुंबईमध्ये  7 रुग्णांची संख्या नोंदवली गेल्याने एकूण रुग्णसंख्या 13 वर गेली आहे.

n दरम्यान, मुंबईतही आता डेल्टा प्लससारख्या स्ट्रेन बदलणाऱया विषाणूंची चाचणी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात होणार आहे. यासाठी अमेरिकेतून आणलेल्या अत्याधुनिक मशीनचे लोकार्पण करण्यात आले आहे.

n अशा प्रकारच्या विषाणूंच्या चाचणीसाठी नमुने घेणे सुरू करण्यात आले असून 400 नमुने गोळा झाल्यानंतर चाचण्या करण्यात येतील. याचा रिपोर्ट दोन दिवसांत मिळणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

जुलैमध्ये असे आढळले रुग्ण

मलेरिया    787

लेप्टो        37

डेंग्यू         28

गॅस्ट्रो        294

हिपेटायटिस   48

‘एच1एन1’   21