
मुंबईत कोरोना रोखण्यात धारावीने आघाडी घेतली असून फेब्रुवारी मध्यापासून सुरू झालेल्या दुसऱया लाटेदरम्यान आज दहाव्यांदा एकही रुग्ण सापडला नाही तर या आठवडय़ात रविवार, बुधवार, गुरुवार असे तिसर्यांदा धारावीने कोरोनाला शून्यावर रोखून आपली पकड मजबूत केली आहे. धारावीबरोबर मध्य मुंबईतील वर्दळीचे भाग असणाऱया दादर आणि माहीममध्येही रुग्णसंख्या घटली असून दादरमध्ये 4 तर माहीममध्ये 1 रुग्ण सापडला.
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत असल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि मुंबईतील सर्वात मोठी दाटीवाटीची वस्ती असलेल्या धारावीने कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱया लाटेवरही नियंत्रण मिळवले असून धारावीत आज दहाव्यांदा एकही रुग्ण सापडला नाही. धारावीत या आधी 14, 15, 23 जूनला तर 4, 7, 17 जुलैला एकही रुग्ण सापडला नव्हता तर ऑगस्ट महिन्यात 3, 8, 11 तारखेला धारावीत एकही रुग्ण सापडला नव्हता.
विशेष लसीकरणात 17,890 जणांचे लसीकरण
धारावीत सिटी बँक आणि जसलोक रुग्णालयाच्या माध्यमातून विशेष लसीकरणाची मोहीम 27 जूनपासून सुरू करण्यात आली असून यात महिनाभरात एक लाख लोकांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 17 हजार 890 जणांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती जी-उत्तरचे आरोग्य अधिकारी डॉ. वीरेंद्र मोहिते यांनी दिली.
दादर, माहीममधील सक्रिय रुग्णसंख्येत घट
कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान दादर आणि माहीममध्ये गेल्या तीन आठवडय़ांत सक्रिय रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत होता. मात्र, गेल्या चार दिवसांत दादरमधील सक्रिय रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली असून 100 वरून ही संख्या 33 वर आली आहे. दादरमध्ये दिवसाची सरासरी रुग्णसंख्या घटली असून आज दादरमध्ये 4 रुग्ण सापडले. माहीममध्येही सक्रिय रुग्णसंख्या आता 71 वरून 43 वर आली आहे. धारावीतील सक्रिय रुग्णांची संख्या 35 वरून 16 वर आली आहे.

































































