
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असतानाच मुंबईत जीवघेणा म्युकर मायकोसिसही आटोक्यात आल्याने धोका टळला आहे. मुंबईत आतापर्यंत 273 जणांना लागण झाली असली तरी यातील 186 जणांनी म्युकर मायकोसिसवर मात केल्याने मुंबईत आता फक्त 30 सक्रिय रुग्ण आहेत.
डोळे, नाक आणि मेंदूवर हल्ला करणाऱया बुरशीजन्य आजारामुळे जिवालाही धोका निर्माण होतो. कोरोना उपचारात अतिप्रमाणात घेतलेली स्टिरॉइड, टोसिलॅझुमॅबच्या अतिवापरामुळे हा आजार होत असल्याचे आरोग्यतज्ञ सांगतात. म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळू लागल्यानंतर पालिकेने ‘टास्क फोर्स’ने ठरवून दिलेल्या प्रोटोकॉलनुसार यंत्रणा उभारून नियोजनबद्ध काम केल्याने म्युकर मायकोसिस आता आटोक्यात आला आहे. म्युकर मायकोसिस रुग्णांवर पालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर रुग्णालयासह खासगी रुग्णालयांतही उपचार सुरू आहेत.
मुंबईबाहेरील 440 जणांना डिस्चार्ज
- म्युकर मायकोसिसची लागण झालेल्या मुंबईबाहेरील 641 रुग्णांवर मुंबईत उपचार करण्यात आले. यामध्ये 132 जणांचा मृत्यू झाला. तर 440 जणांनी म्युकर मायकोसिसवर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे मुंबईबाहेरील सध्या 69 सक्रिय रुग्ण आहेत.
- तर मुंबईत एकूण 914 म्युकर मायकोसिस रुग्णांवर उपचार करण्यात आले. यातील 188 जणांचा मृत्यू झाला. तर 626 जणांनी म्युकर मायकोसिसवर मात केल्याने एकूण 100 सक्रिय रुग्ण आहेत.
…तरीही काळजी घ्या
म्युकर मायकोसिसची लागण झाल्यास डोळे चुरचुरणे-दुखणे, लाल होणे, स्राव येणे, दृष्टी कमी होणे, नाकातून दुर्गंधी येणारा स्राव येणे, नाक दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, नाकातून बुरशीजन्य दुर्गंधीयुक्त काळा स्राव येणे, डोके दुखणे अशा लक्षणांनंतर म्युकर मायकोसिचा विषाणू मेंदूवरही आघात करतो. त्यामुळे रुग्णंख्या घटली असली तरी मुंबईकरांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.






























































