म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करताय….’या’ गोष्टींकडे द्या लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअर बाजारातील गुंतवणूक धोक्याची असल्याने काहीजण गुंतवणुकीसाठी म्युचुअल फंडचा पर्याय निवडतात. प्रत्यक्ष शेअर बाजारात गुंतवणूक न करता शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी म्युचुअल फंड हा सुरक्षित पर्याय मानला जातो. प्रत्यक्ष शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी अनुभव गरजेचा असतो. तसेच जोखीम स्विकारण्याची तयारी असवी लागते. हे सर्व टाळण्यासाठी अर्थतज्ज्ञ म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. मात्र, म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते.

आपल्या ज्या म्युचुअल फंडची निवड करतो ते फंड हाऊस आपल्या रकमेपैकी ठराविक रक्कम वेगवेगळ्या प्रकारच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात. त्यातून चांगला नफा मिळाल्यास गुंतवणूकदारांना फायदा होतो. त्यासाठी फंड हाऊसकडून ठाराविक शुल्क आकारले जाते. त्यामुळे शेअर बाजारापेक्षा हा सुरक्षित पर्याय आहे. मात्र, नेमकी कोणत्या म्युचुअल फंडमध्ये गुतंवणूक करावी, असा प्रश्न अनेक गुंवणूकदारांना पडतो. फंड निवडताना काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असते.

एका विशिष्ट क्षेत्रात म्हणजे फार्मा, बँकिंग, आयटी अशा ठराविक क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या फंडांची निवड करणे टाळायला हवे. म्युचुअल फंडमधील गुंतवणूक ही दीर्घ मुदतीसाठी असते. ठराविक क्षेत्रातील शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास ते क्षेत्र काही वर्षांनी तेजीत असेलच किंवा त्याची काय परिस्थिती असेल, याचा अंदाज बांधणे कठीण असते. त्यामुळे विविध क्षेत्रातील शेअरमध्ये गुतंवणूक करणाऱ्या म्युचुअल फंडची निवड करणे फायद्याचे ठरते. त्यामुळे एखाद्या क्षेत्रातील शेअर मंदीत असले तरी आपले नुकसान होण्याची शक्यता कमी असते.

कमी नेट अॅसेट व्हॅल्यू (एनएव्ही) असलेल्या म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त युनिट मिळतील आणि त्याचा भविष्यात चांगला फयदा होईल, असा विचार काही गुंतवणूकदार करतात. मात्र, प्रत्यक्षात शेअर बाजारातील चढउतार पाहता, हे गणीत त्याला लागू पडत नाही. कमी एनएव्हीमध्ये जास्त युनीट मिळतील पण त्यातून जास्त परतावा मिळेलच, याचा खात्री नसते. त्यामुळे एनएव्ही महत्त्वाचा नसून तो फंड कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करत आहे, ते बघणे महत्त्वाचे असते.

म्युचुअल फंडमध्ये जोखीम कमी असल्याने काहीजण अनेक म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. मात्र, असे करणे अयोग्य असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अनेक म्युचुअल फंडचा परतावा सामान्य असतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना फारसा फायदा होत नाही. त्यामुळे अनेक म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी आपल्या गरजेप्रमाणे दोन-तीन म्युचुअल फंडची निवड करून त्यात गुंतवणूक करावी, भविष्यात जास्त गुंतवणूक शक्य असल्यास त्या फंडसाठीच्या एसआयपीची रक्कम आपण वाढवू शकतो. गुंतवणुकीचा हेतू आणि ती किती वर्षांसाठी करायची, याचा विचार करूनच फंडची निवड करावी.

म्युचुअल फंडची निवड करताना त्याचा आधीचा रेकॉर्ड, कंपनीची कामगिरी आणि गुंतवणूकदारांना फंडने दिलेले रिटर्न, परतावा, डिव्हिडंट या गोष्टींची माहिती घेऊन फंडची निवड करावी. अनेकजण म्युचुअल फंडचा एनएव्ही कमी झाला तर भीतीमुळे त्यातून रक्कम काढून घेतात. काहीजण एनएव्ही वाढल्यास नफा मिळवण्यासाठी फंड रिडम करतात. मात्र, असे करणे अयोग्य असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. म्युचुअल फंडमधील गुतंवणूक ही दीर्घ मुदतीसाठी असून एनएव्ही कमी झाल्यास घाबरण्याची गरज नाही. त्या महिन्यातील एसआयपीमधून जास्त युनिट मिळतील. तसेच भविष्यात एनएव्ही वाढण्याची शक्यता असते. ही दीर्घ मुदतीची गुंतवणूक असल्याचे लक्षात ठेवावे. त्यामुळे चांगल्या म्युचुअल फंडची निवड करून त्यात दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.