
वाहने कंपनीत भाड्याने लावण्यासाठी घेतल्यानंतर त्यांचे जीपीएस काढून परस्पर विक्री करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट सहाने अटक केली. टोळीकडून 1 कोटी 22 लाख रूपये किंमतीची 13 वाहने जप्त करण्यात आली आहेत. मलिक बाबा शहा उर्फ मुजाहिद रफिउद्दीन सय्यद गिलानी (वय 38, रा. शिवनेरीनगर, कोंढवा), ओंकार ज्ञानदेव वाटाणे (वय 28, रा. हिंगणी बेर्डी, ता. दौंड) आणि मोहमद मुजीब मोहमद बसीर उद्दीन (वय 48, रा. संतोशनगर, हैदराबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. टोळीने निजामाबाद, तेलंगणा, लातूर, दौंड परिसरात वाहनांची विक्री केली होती. अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक गणेश माने यांनी दिली.
खासगी कंपनीसाठी मोटार चालविणाऱ्या गिलाणी याच्यासोबत फिर्यादीची ओळख झाली. त्यावेळी आरोपीने तक्रारदाराला खोटे नाव सांगून नोएडा येथील एका कंपनीत त्यांची मोटार भाड्याने लावतो, असे आमिष दाखविले. महिन्याला त्यांना 30 हजार रूपये मिळतील, असे सांगण्यात आले. आगाऊ काही रक्कम देखील दिली. त्यामुळे तक्रारदार यांनी विश्वास ठेऊन त्यांची आरोपीला मोटार भाड्याने लावण्यासाठी दिली. त्यांच्या ओळखीतील तब्बल 28 नागरिकांना त्यांच्याकडे वाहने भाड्याने लावण्यास दिले. आरोपींनी तक्रारदाराला सुरवातीला काही पैसे दिले. पण, नंतर पैसे देण्यास टाळण्यास सुरवात केली. त्यामुळ तक्रारदार यांनी आरोपीने सांगितलेल्या कंपनीचा शोध घेतला असता, अशी कोणतीच कंपनी नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी लोणीकाळभोर पोलिसांकडे तक्रार दिली होती.
गुन्ह्याचा युनिट सहाकडून समांतर तपास सुरू होता. युनिट सहाच्या पथकाला मोटार दौंड परिसरात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस नाईक कानिफनाथ कारखेले आणि नितीन मुंढे यांना मिळाली. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या पथकाने सापळा रचून तिघांना अटक केली. त्यांच्याकडे तपास केल्यानंतर त्यांनी सर्व वाहने कमी किंमतीमध्ये विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार विविध ठिकाणाहून 13 वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कामगिरी एपीआय नरेंद्र पाटील, मच्छिंद्र वाळके, नितीन मुुंढे, नितीन शिंदे, प्रतीक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर यांनी केली.


























































