भंडारा – शाळा वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांचा कॅंडल मार्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील स्टेशन रोड वरील लाल शाळा नावाने प्रसिद्ध असलेली जुनी मनरो शाळा व आताच्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची भव्यता संपण्याच्या मार्गावर आहे. विद्यार्थ्यांच्या खेळण्याच्या मैदानावर जिल्हा परिषद दुकानांची दोनमजली चाळ बांधत आहे. यामुळे रस्त्यावरून दिसणारी लाल शाळा भविष्यात दिसणार नाही. जिल्हा परिषदेने मुलांची खेळायची जागा बिल्डरला विकून शाळेची भव्यता नष्ट करण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. दुकानांची चाळ झाल्यावर शाळेची इमारत 100 वर्ष जुनी असल्याचे कारण सांगून या इमारतीची जागा विकून मोठे शॉपिंग मॉल बांधण्याचा घाट ही घातला जावू शकतो, असं माजी विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

शाळेला ऐतिहासिक वारसा

मनरो शाळेला ऐतिहासिक वारसा आहे. मनरो शाळेचे वैभवः केवळ इमारतीमुळेच नव्हते तर या शाळेचा लौकीक फार मोठा होता. अनेक विद्यार्थी आज जगभरात अतिशय यशस्वीरित्या आपले काम करीत आहेत. अनेक विद्यार्थी प्रशासनातील मोठ्या पदांवर आहेत. या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या भावना देखील शाळेच्या भव्य इमारतीप्रमाणे भव्य आणि उत्तुंग आहे. मनरो शाळेच्या परिसरात दुकानांची चाळ बांधण्याचा जिल्हा परिषदेचा निर्णय योग्य नाही, असे मत माजी माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.

शाळेचा इतिहास

पूर्वीची मनरो शाळेची भव्यता डोळ्यात भरण्यासारखी होती. प्रचंड मोठे मैदान होते. आज ज्या जागेवर हुतात्मा स्मारक आणि नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे ती जागा म्हणजे मनरो शाळेचे फुटबॉलचे मैदान होते. शाळेच्या इमारतीच्या बाजूला दोन शेतीही होती. त्याकाळी कृषी हा विषय शाळेत शिकविला जात होता. धानाची शेती बागायत भाजीपाला लागवड केली जायची. मनरो शाळेत गुणवत्तेनुसार प्रवेश मिळायचा. त्याकाळात प्रवेशाची यादी लागायची. मनरो शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रवेश संपले की इतर शाळांचे प्रवेश सुरु व्हायचे. दरम्यान, शाळेचा ग्राउंड वाचवण्यासाठी गुरुवारी शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढला होता.