
>>स्पायडरमॅन
सध्या ‘जलवायू परिवर्तन’ या विषयाचा मोठय़ा प्रमाणावर ऊहापोह चालू आहे. मानवाने निसर्गाला किती धोका पोचवला आहे आणि त्याचे भीषण दुष्परिणाम जगभरात कसे समोर येत आहेत, ते आपण पाहातच आहोत. जर याच वेगाने आपण निसर्गाची हानी करत राहिलो तर जगाचा अंत फार दूर नाही, असे जगभरातील पर्यावरणतज्ञांचे ठाम मत आहे. मानव निर्मित ई-कचरा हा या निसर्गाच्या हानीचे एक प्रमुख कारण आहे हे गेली काही दशके सातत्याने समोर येत आहे. त्यातच आता मानवाने लिथियम बॅटरीचा किती प्रचंड विषारी कचरा निसर्गाच्या पोटात ढकलला आहे, ते समोर आले आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या आगमनानंतर या लिथियम बॅटरीच्या कचऱयात प्रचंड भर पडत आहे. संपूर्ण जगात या बॅटरीचा कचरा जमा होण्याचे प्रमाण 15 अब्ज इतके आहे. एकटय़ा अमेरिकेत दरवर्षी 3 अब्ज बॅटरीचा कचरा जमा होतो. या बॅटरीतील विषारी घटक हवा, पाणी आणि जमिनीत मिसळून प्रचंड मोठय़ा प्रमाणात ग्लोबल वार्ंमगला हातभार लावत असतात. तज्ञांच्या एका अहवालानुसार 2020 सालापर्यंत चायना या एकाच देशाने तब्बल 5 लाख मेट्रिक टन लिथियम-आयनयुक्त बॅटऱयांचे उत्पादन केले आहे, तर संपूर्ण जगात हे उत्पादनाचे प्रमाण 2030 सालापर्यंत 20 लाख मेट्रिक टनापर्यंत पोहोचेल, मात्र उत्पादनाचे प्रमाण इतक्या प्रचंड वेगाने वाढत असताना या बॅटऱयांचा रिसायकलिंगमध्ये मात्र जग मोठय़ा प्रमाणावर उदासिन असल्याचे दिसून येते. अमेरिका आणि इतर युरोपियन देशात 5 टक्के लिथियम बॅटऱयांना रिसायकल केले जाते, तर ऑस्ट्रेलियासारख्या देशात हे प्रमाण फक्त 2 टक्के आहे. हिंदुस्थानातदेखील इलेक्ट्रिक वाहनांचा उद्योग झपाटय़ाने प्रगती करतो आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीला त्रासलेले लोक इंधनाला पर्याय म्हणून आणि भविष्यातील सुलभ तंत्रज्ञान म्हणून इलेक्ट्रिक गाडय़ांना प्राधान्य देऊ लागले आहेत. अशा वेळी लिथियम बॅटरीच्या कचऱयाला रोखण्यासाठी वेळीच काही योजना आखणे गरजेचे आहे.





























































