साय-फाय – कोरोनाच्या उपचार पद्धतीत बदल?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

सध्या जगभरात कोरोनावरील उपचारांसाठी ‘लस’ हा एकमेव खात्रीचा पर्याय आहे. जगातील सर्व देशांनी विविध लसींना विश्वासाने मान्यता देऊन आपापल्या देशात मोठय़ा प्रमाणावर लसीकरणदेखील सुरू केले आहे. या लसीकरणाचा फायदादेखील दिसून येत असून कोरोनाच्या येणाऱया प्रत्येक लाटेबरोबर जोरदार लढाई सुरू आहे. मात्र भविष्यात लसीच्या बरोबरच कोरोनाच्या उपचारासाठी हे व्हॅक्सिन इन्हेलर अथवा गोळ्यांच्या माध्यमातूनदेखील दिले जाणे शक्य होणार आहे.

दक्षिण स्वीडनमधील एका लॅबमध्ये सध्या काडीपेटीच्या आकाराच्या एका इन्हेलरवरती अधिक अभ्यास चालू आहे. हे इन्हेलर लवकरच कोरोना उपचारात मोठी क्रांती आणेल असा त्याची निर्मिती करणाऱया शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. या इन्हेलरच्या माध्यमातून कोरोना व्हॅक्सिन पावडर स्वरूपात घेणे शक्य होणार आहे. सध्या अस्थमा पेशंट ज्याप्रमाणे उपचारासाठी इन्हेलरचा वापर करतात अगदी तेवढेच हे व्हॅक्सिन घेणे शक्य असणार आहे. सध्या अस्थमा पेशंटसाठी इन्हेलर बनवणाऱया कंपन्यांच्या दाव्यानुसार कोरोना व्हॅक्सिनसाठी इन्हेलर बनवणे अत्यंत सोपे असेल व ते अत्यंत माफक दरात उपलब्धदेखील असेल. लोकांना फक्त या इन्हेलरवरील एक पातळ प्लॅस्टिकची पट्टी हटवावी लागेल आणि मग ते लगेच वापरण्यासाठी उपलब्ध असेल. त्यानंतर हे इन्हेलर तोंडात धरून एक दीर्घ श्वास घेतला की झाले काम!

स्टॉकहोमच्या इम्युनोलॉजी स्टार्टअप असलेल्या ‘आयएसआर’ने कोरोनावरील उपचारासाठी एक पावडर बनवली आहे. या औषधामध्ये ‘कोविड-19 व्हायरस प्रोटीन’चा उपयोग करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे हे प्रोटीन 40 डिग्रीपर्यंतचे तापमान सहन करू शकते. याउलट फायझर, मॉडर्ना यांसारख्या लसीचे उत्पादन डीएनए आणि आरएनए तंत्रज्ञानावर आधारित आहे. सध्या जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेले सर्व व्हॅक्सिन हे तरल स्वरूपात, अर्थात लसींच्या स्वरूपात आहे. या लसींना साठवण्यासाठी उणे 70 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची गरज लागत असल्याने डीप फ्रिझरचा वापर करणे आवश्यक असते. या सर्व प्रक्रियेला ‘कोल्ड चेन’ असे म्हटले जाते. मात्र हे पावडर स्वरूपातील व्हॅक्सिन ‘कोल्ड चेन’ प्रक्रियेशिवायदेखील वितरीत करणे शक्य होणार आहे. मुख्य म्हणजे हे व्हॅक्सिन कोणत्याही आरोग्यसेवकाच्या मदतीशिवाय घेणे सामान्य नागरिकांना सहजशक्य असणार आहे. यामुळे प्रचंड मनुष्यबळ तर वाचेलच, त्या जोडीने औषधोपचारांनादेखील प्रचंड वेग मिळेल.

दक्षिण आफ्रिकेसारख्या देशात स्वदेशी लस उपलब्ध नाही. इथे तापमानही प्रचंड उष्ण असते आणि विजेची समस्यादेखील मोठय़ा प्रमाणावरती आहे. त्यामुळे यासारखी परिस्थिती असलेल्या इतर देशांमध्येदेखील लसीकरणाला वेग मिळू शकत नाही. तसेच अनेक आव्हानांनादेखील सामोरे जावे लागते. अशा देशांमध्ये हे पावडर व्हॅक्सिन महत्त्वाचा पर्याय ठरू शकते. अर्थात या पावडर व्हॅक्सिनला अजून बऱयाच चाचण्यांना सामोरे जायचे आहे आणि मुख्य म्हणजे हे व्हॅक्सिन लसीइतकेच प्रभावी ठरते का नाही याची मुख्य चाचणी समोर यायची आहे. मात्र हे व्हॅक्सिन प्रभावी ठरल्यास सुईला घाबरणाऱया अनेकांची सोय तर होणार आहेच, पण लसीप्रमाणे साठवणुकीसाठी या व्हॅक्सिनला प्रचंड ऊर्जा वापरणाऱया फ्रीजची गरज नसल्याने पर्यावरणाची हानीदेखील मोठय़ा प्रमाणात रोखली जाणार आहे.
जोवर जगातील शेवटचा माणूस सुरक्षित होत नाही तोवर कोणी सुरक्षित नाही, हे प्रमुख उद्दिष्ट जगभरच्या शास्त्रज्ञांनी समोर ठेवले आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग देण्याबरोबर इतरही पर्यायांचा शोध घेत जगाच्या प्रत्येक कोपऱयापर्यंत व्हॅक्सिन पोचवण्याचा त्यांचा निर्धार आहे. यासाठी अनेक देश ‘फिल ऍण्ड फिनिश’ अर्थात स्वतःच्या जमिनीवरच व्हॅक्सिनला बाटल्यांमध्ये भरण्यासाठी केंद्र उघडण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळे व्हॅक्सिन उत्पादनात शेवटचे पाऊल त्यांना स्वदेशात पूर्ण करता येईल. हे पावडर व्हॅक्सिन जर सर्व कसोटींना उतरले, तर या पावडरला स्टेराइल पाण्याच्या द्रवात भरून इंजेक्शनच्या मदतीनेदेखील वापरणे शक्य होणार आहे. सध्या फक्त उंदरांवर याचे परीक्षण करण्यात आले असून, पुढील दोन महिन्यांत मनुष्यावर याची चाचणी होणार आहे.

z [email protected]