
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड तिसऱया कसोटी क्रिकेट सामन्यास मुकणार आहे. त्याच्या खांद्याला झालेली दुखापत बरी न झाल्याने इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. दुसऱया कसोटीतील चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना मार्क वूडच्या खांद्याला दुखापत झाली होती.
मार्क वूड लीडस् कसोटीस मुकणार असला तरी तो मेडिकल टीमच्या देखरेखीखाली संघासोबत असणार आहे. तिसरी कसोटी संपल्यानंतर मार्क वूडची तपासणी होऊन पुढील सामन्यासाठी निर्णय घेतला जाईल. बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड व जोफ्रा आर्चर हे प्रमुख खेळाडू हिंदुस्थानविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत नाहीत. त्यातच मार्क
वूडही तिसऱया कसोटीस मुकणार असल्याने मालिकेत
1-0ने पिछाडीवर पडलेल्या यजमान इंग्लंड संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे टी 20मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या डेविड मलानचे कसोटीत पुनरागमन झाले आहे. याचबरोबर वेगवान गोलंदाज साकिब महमूदला संघात स्थान मिळाले आहे. साकिब महमूदला तिसऱया कसोटीत मार्क वूडच्या जागेवर संधी मिळण्याची शक्यता आहे.
तिसऱया कसोटीसाठी इंग्लंडचा संघ – जो रूट (कर्णधार), मोइन अली, जेम्स अँडरसन, जॉन बेअरस्टोस रोरी बन्रस, जोस बटलर, सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेंस, साकिब महमूद, डेविड मलान, क्रेग ओव्हरटन, ओली पोप, ओली रॉबिन्सन.




























































