किरकोळ भांडणातून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किरकोळ भांडणातून पेटवून घेतलेल्या पत्नीचा आणि विषारी औषध प्राशन केलेल्या पतीचा मृत्यू झाल्याची घटना महाबळेश्वर तालुक्यातील जावळी येथे घडली आहे. शांताबाई दगडू कदम (वय 70) आणि दगडू नारायण कदम (वय 76, दोघे रा. जावळी, ता. महाबळेश्वर) अशी मृत वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत.

किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला कुंभरोशी हे गाव आहे. या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर डोंगरात जावळी या गावात राहणाऱया दगडू कदम आणि शांताबाई कदम यांच्यात 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. यातून चिडलेल्या शांताबाई यांनी स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पेटलेल्या अवस्थेत त्यांनी घरासमोरील ओढय़ात उडी मारली होती.

ओढय़ाला पाणी असल्याने त्या वाहून गेल्या होत्या. पतीने अंधारात त्यांचा शोध सुरू केला; पंरतु त्यांचा शोध लागला नाही. बराच वेळ शोध घेतल्यानंतर दगडू कदम घरी परत आले. आपल्यामुळे आपल्या पत्नीने आत्महत्या केल्याचे दुःख झाल्याने त्यांनी स्ट्रॉबेरी पिकावर मारण्यासाठी आणलेले कीटकनाशक प्राशन केले. दरम्यान, या घटनेची माहिती गावकऱयांना समजताच त्यांनी कदम यांना तत्काळ कुंभरोशी येथे उपचारांसाठी आणले. तर, काही ग्रामस्थांनी ओढय़ात उडी घेतलेल्या शांताबाई यांचा शोध सुरू केला. शांताबाई एका अडचणीच्या ठिकाणी अडकून पडल्या होत्या. त्यातून ग्रामस्थांनी त्यांची सुटका केली व त्यांनाही कुंभरोशी येथे आणले.

कुंभरोशी येथील अभय हवालदार व त्यांचे सहकारी बाळासाहेब पार्टे या दोघांनाही रुग्णवाहिकेतून पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईला हलविण्यात आले. 15 ऑगस्ट रोजी दगडू कदम यांचा मृत्यू झाला. दरम्यान, शांताबाई यांचाही रविवारी मृत्यू झाला. दरम्यान, अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर पोलीस तपासासाठी जावळी गावात पोहोचू शकले नसल्याने पोलादपूर पोलिसांत ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.