
नगर शहरातून दुचाकी चोरणाऱया सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी चारजणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली आहे.
दिलीप दत्तात्रय शिंदे (वय 26), प्रफुल्ल गजानन गांगेकर, (वय 30, दोघे रा. गोंधळेमळा, नागरदेवळे, ता. नगर), खलील बालम शेख, (वय 45, रा. नागरदेवळा, ता. नगर), अमजद हुसेन शेख, (वय 45, रा. मोमिनपुरा, भिंगार) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. तर, अवतार जहूर अहमद शेख (रा. गवळीवाडा, भिंगार) हा फरार झाला आहे.
गणेश सोहनलाल गुलाटी (वय 22, रा. इंदिरा कॉलनी, तारकपूर) यांची बजाज पल्सर दुचाकी घरासमोरून चोरीला गेली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. नगर शहरासह जिल्ह्यात दुचाकीचोरीचे प्रमाण वाढत असल्याने दुचाकीचोरांचा छडा लावण्याचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिला होता. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या तीन दिवसांपासून आरोपींचा शोध सुरू केला होता. दरम्यान, आरोपी दिलीप शिंदे याने साथीदारांसह दुचाकी चोरल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने नागरदेवळे येथे जाऊन आरोपी शिंदे याला अटक केली. चौकशीदरम्यान प्रफुल्ल गांगेकर याच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली शिंदे याने दिली. त्यानंतर पोलिसांनी गांगेकर यालाही ताब्यात घेऊन गुलाटी यांची दुचाकी हस्तगत केली.
या दोघांकडे अधिक चौकशी करीत असताना त्यांनी नगर शहरातील रेल्वे स्टेशन पार्किंग, गुलमोहर रोड, नेता सुभाष चौक, गोविंदपुरा व सिव्हिल हॉस्पिटल येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. यांतील तीन दुचाकी भिंगार व नागरदेवळे येथे विकल्या असून, दोन दुचाकी आमच्याकडे असल्याचे दोघांनी सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी खलील शेख व अमजद शेख यांना ताब्यात घेतले. तसेच अवतार शेख याचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक कटके यांनी सांगितले.
गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, हेड कॉन्स्टेबल संदीप पवार, संदीप घोडके, शंकर चौधरी, विशाल दळवी, संतोष लोढे, संदीप चव्हाण, लक्ष्मण खोकले, ज्ञानेश्वर शिंदे, कमलेश पाचरुट, योगेश सातपुते व संभाजी कोतकर यांनी ही कारवाई केली.

























































