मुंबईवर होणार होती दोन विमानांची टक्कर, सुदैवाने टळला अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईवर दोन विमानांची टक्कर होता होता टळल्याचं वृत्त आहे. ही दोन विमानं मुंबईवरील आकाशात एकमेकांसमोर आली होती. सुदैवाने अवघ्या 300 फुटांवर हा अपघात टळला.

ही घटना जानेवारी महिन्यात घडली होती. 29 जानेवारी रोजी एअर एशिया कंपनीचं अहमदाबाद ते चेन्नई असा प्रवास करणारं विमान आणि इंडिगोचं बेंगळुरू ते बडोदा असा प्रवास करणारं विमान मुंबईवर आमनेसामने आलं होतं.

दोन्ही विमानांमध्ये अवघ्या 8 किमीचं अंतर होतं. अहमदाबाद ते चेन्नई असा प्रवास करणारं विमान सर्वसाधारणतः भावनगरवरून प्रवास करतं. पण, त्यादिवशी या विमानाने जी विमानं मुंबईमध्ये थांबा घेऊन पुढे जातात, त्या विमानांचा मार्ग निवडला होता.

या मार्गावरच नेमकं बेंगळुरूहून बडोद्याला जाणारं इंडिगोचं विमानही समोरून येत होतं. त्याचा मार्ग देखील भरूचजवळून जात होता. त्यामुळे ही दोन्ही विमानं मुंबईवरील आकाशात एकाच मार्गावर समोरासमोर प्रवास करत होती. सुदैवाने मुंबईच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलिंग विभागाने वेळीच धोक्याचा इशारा दिला. पण, रडार नियंत्रकाला हा इशारा कळला नाही.

जोवर नियंत्रकाला हा इशारा कळला, तोपर्यंत ही विमानं आमनेसामने आली होती. त्यांच्यात अवघं आठ किमी इतकं अंतर राहिलं होतं. सुदैवाने एअर एशियाच्या वैमानिकाने धोक्याचा इशारा समजून ते विमान आणखी काही किमी वर नेलं. तेव्हाही दोन्ही विमानांत अवघं 300 फुटांचं अंतर होतं. सुदैवाने दोन्ही विमानांनी आपला मार्ग बदलल्यामुळे हा भीषण अपघात टळला.

या प्रसंगानंतर एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. त्या चौकशी समितीच्या अहवालात या प्रसंगाची माहिती नमूद करण्यात आली. हवाई वाहतूक नियंत्रण विभागात कोरोना लॉकडाऊननंतर कर्मचाऱ्यांच्या कमी संख्येमुळे हा प्रसंग ओढवल्याचा उल्लेखही या अहवालात करण्यात आला आहे.