‘देवमाणूस’मधील रेश्माला वेब सीरिजमध्ये ब्रेक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘देवमाणूस’ या मालिकेतील रेश्माच्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री गायत्री बनसोडे आता वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. अंधश्रद्धेवर आधारित ‘परीस’ या सस्पेन्स थ्रीलर वेब सीरिजमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

देशातला बराचसा प्रदेश ग्रामीण असून या भागात आजही लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणात अंधश्रद्धा दिसून येते. अशा या सामाजिक, ज्वलंत आणि महत्त्वाच्या विषयावर वेब सीरिजची निर्मिती करण्याचे धाडस ‘प्लॅनेट मराठी’ने केले आहे. या वेब सीरिजचे संवाद, पटकथा आणि दिग्दर्शन मयूर करंबळकर, कुलदीप दंगाडे आणि विशाल सांगले यांनी केले आहे. ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘वन कॅम प्रॉडक्शन’ प्रस्तुत वेब सीरिजची कथा मयूर करंबळकर यांची आहे. सोन्याच्या लोभापोटी गावातील काही लोक परीसाच्या शोधात निघतात. त्यांचा हा शोध त्यांना कुठपर्यंत घेऊन जातो, त्यांना परीस मिळवण्यात यश येतं का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना यात मिळणार आहेत. ही वेब सीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर 31 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.