
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले असून, हे वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले असून, या विधानाचा सर्वत्र निषेध होत आहे. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येत आहे.
काँग्रेसच्या वतीने आज विभागीय बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीला काँग्रेसचे अनेक नेते मंडळी उपस्थित आहेत. या बैठकीस उपस्थित असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता राज्यातील अनेकजण केंद्रामध्ये मंत्री झाले. याचा आनंद झाला होता, परंतू नारायण राणे यांनी केलेले हे वक्तव्य महाराष्ट्राची संस्कृती नाही. या वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेकजण मंत्री झाल्यामुळे याचा फायदा लसीकरण, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, गोरगरीबांचे प्रश्न, छोट्या उद्योगांचे प्रश्न निकाली लागतील आणि केंद्राकडून राज्याला मदत होईल, अशी अपेक्षा असताना नारायण राणेंनी केलेले हे वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नसून, काँग्रेस पक्ष या वक्तव्याचा निषेध करत असल्याचे नाना पटोले म्हणाले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणेच्या केलेल्या समर्थनाबद्दल विचारले असता महाराष्ट्राची संस्कृती जोपासणे हे आपले काम आहे. कुणाची शैली जोपासणे नाही, या वक्तव्याबद्दल राणे यांच्यावर गुन्हा दाखल होवून त्यांच्यावर कारवाई होईल, कायदा हा कोणत्या पदावर असलेले व्यक्तीसाठी नाही त्यामुळे नारायण राणे यांच्यावर कारवाई होणार असल्याचेही नाना पटोले यावेळी म्हणाले.
































































