फाफलली… अटक टाळण्यासाठी धावाधाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-highcourt

अटक अटळ आहे या भीतीने नारायण यांची अक्षरशः फाफलली. मला कोणी अटक करू शकत नाही, अशी वल्गना करणाऱया राणेंनी रत्नागिरी कोर्टात आणि मुंबईच्या हायकोर्टात आपल्या वकिलांना पिटाळले. अटकपूर्व जामिनासाठी दोन्ही कोर्टांत धावाधाव सुरू झाली. मात्र पहिल्यांदा रत्नागिरीत आणि नंतर हायकोर्टाने राणेंची याचिका फेटाळून लावली.

याचिकेची स्कॅन कॉपी स्वीकारण्यास खंडपीठाने नकार दर्शवला व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर यावर सुनावणी घेऊ असे स्पष्ट केले.

पुणे, नाशिक आणि महाड येथे दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यात यावेत यासाठी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी करत राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र याचिकेची नोंद होऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय तातडीने सुनावणी घेता येणार नाही असे स्पष्ट करत न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठाने त्यांची मागणी फेटाळून लावली. न्यायालयाने आज कोणताही दिलासा न दिल्याने राणेंच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत.

आपल्याविरोधातील गुन्हे रद्द करावेत अशी मागणी राणे यांनी अर्जाद्वारे केली. त्यावर दुपारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी हायकोर्ट रजिस्ट्रीकडे याचिकेची नोंदणी न करताच त्यावर सुनावणी घेण्यासाठी राणे यांच्या वकिलांनी न्यायालयाला विनंती केली. मात्र ही विनंती फेटाळून लावत यावर तातडीने सुनावणी घेण्यास खंडपीठाने नकार दिला तसेच याचिकेची रीतसर नोंदणी करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास राणे यांना बजावले. मात्र असे असताना राणे यांच्या वकिलांनी सायंकाळी पुन्हा एकदा यावर सुनावणी घेण्यासाठी खंडपीठाकडे आग्रह धरला. त्यावेळी न्यायालयाने परत एकदा राणे यांची मागणी फेटाळून लावत त्यांना दिलासा देण्यास नकार दिला व योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडून याचिका दाखल करण्यास सांगितले.

  • मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणे यांच्याविरोधात पुणे, नाशिक, महाड पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 500, 505(2), 153 ब (1)(क) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सीआरपीसी कलम 41(अ) अंतर्गत आपल्याला नोटीस न बजावताच गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा करत नारायण राणे यांनी ऍड. अनिकेत निकम यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अर्ज केला.