
लॉर्ड्स या क्रिकेटच्या पंढरीत देदीप्यमान विजय साकारणाऱया हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा बुधवारपासून लीड्स येथे सुरू झालेल्या तिसऱया कसोटीचा पहिला डाव अवघ्या 78 धावांमध्येच कोसळला. जेम्स अॅण्डरसन या अनुभवी गोलंदाजाने सकाळच्या सत्रात लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा व कर्णधार विराट कोहलीला पॅव्हेलियनला पाठवल्यानंतर व्रेग ओव्हर्टन, ओली रॉबीनसन व सॅम करण यांनी टीम इंडियाचा डाव गुंडाळला. हिंदुस्थानचा डाव 40.4 षटकांत गडगडला. रोहीत शर्मा (19 धावा) व अजिंक्य रहाणे (18 धावा) या दोघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. नऊ फलंदाज एकेरीच धावा करू शकले. हिंदुस्थानने पहिल्या डावात झळकावलेल्या धावसंख्येत अतिरिक्त धावा होत्या 16. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने पहिल्या डावात बिनबाद 58 धावा केल्या होत्या.
23 धावांत सात फलंदाज गारद
उपाहारानंतर खेळताना हिंदुस्थानची अवस्था 4 बाद 56 धावा अशी होती. पण ज्या 56 या धावसंख्येवर अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर अवघ्या 23 धावांत टीम इंडियाचे सात फलंदाज बाद झाले. ओली रॉबीनसनच्या गोलंदाजीवर रिषभ पंत दोन धावांवर जोस बटलरकरवी झेलबाद झाला आणि त्यानंतर व्रेग ओव्हर्टनच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर रोहीत शर्माने आपली विकेट गमावली. शॉर्ट मिड ऑनला ओली रॉबीनसनने त्याचा झेल टिपला. रोहीत शर्मा बाद झाल्यानंतर तळाच्या फलंदाजांची डाळ शिजली नाही. रवींद्र जाडेजा (4 धावा), मोहम्मद शमी (0), इशांत शर्मा (नाबाद 8 धावा), जसप्रीत बुमराह (0) व मोहम्मद सिराज (3 धावा) यांच्याकडून निराशा झाली. जेम्स अॅण्डरसनने 6 धावांच्या मोबदल्यात तीन फलंदाजांना आपले शिकार केले. व्रेग ओव्हर्टनने तीन व ओली रॉबीनसन व सॅम करण यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
नाणेफेक जिंकल्यानंतर अपयश, अॅण्डरसनचा भेदक मारा
विराट कोहलीने नाणेफेक जिंपून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जेम्स अॅण्डरसनने पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर मागील कसोटीतील शतकवीर लोकेश राहुलला यष्टीरक्षक जोस बटलरकरवी शून्यावर बाद करीत धक्का दिला. कसोटीत पहिल्याच षटकात फलंदाज बाद करण्याची जेम्स अॅण्डरसनची ही तिसरीच खेप ठरली. त्यानंतर जेम्स अॅण्डरसनने चाचपडणाऱया चेतेश्वर पुजारालाही जोस बटलरकरवी झेलबाद केले. त्याने 9 चेंडूंत फक्त एक धाव केली. जेम्स अॅण्डरसननेच विराट कोहलीचा पत्ता कट केला. अवघ्या सात धावांवर जोस बटलरकरवी तो झेलबाद झाला. रोहीत शर्मा व अजिंक्य रहाणे या जोडीने 35 धावांची भागीदारी करताना डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण उपाहाराला काही मिनिटे बाकी असतानाच ओली रॉबीनसनच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणे यष्टीरक्षक जोस बटलरकरवी झेलबाद झाला आणि हिंदुस्थानची अवस्था 4 बाद 56 धावा अशी बिकट झाली.
हिंदुस्थानचा इंग्लंडमधील कसोटीतील नीचांक
42 धावा -1974 (लॉर्ड्स)
58 धावा -1952 (ओल्ड ट्रपर्ह्ड)
78 धावा -2021 (लीड्स)
82 धावा -1952 (ओल्ड ट्रपर्ह्ड)
92 धावा -1967 (एजबॅस्टन)




























































