
>> डॉ. केतन पारीख
अनेकदा उपचारासाठी ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात येऊन तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन अथवा उपचार घ्यावे लागतात. यामध्ये पैसे, वेळ खूप खर्चिक होतात, पण पायरामेडद्वारे तेथील स्थानिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने या अनोख्या माध्यमातून विशेष सल्ला आणि उपचार दिले जातील. यामुळे रुग्णांना प्रत्येक वेळी शहरात प्रवास करण्याची आवश्यकता नाही.
आपल्या देशात दर्जेदार आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याच्या उद्देशाने पायरामेड टेलिमेडिसीन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील लोकसंख्येसाठी आवश्यक असलेल्या दर्जेदार तज्ञ, वैद्यकीय सल्लामसलत उपलब्ध करून प्राथमिक आरोग्यसेवा पुरविण्याचा यामागचा मुख्य उद्देश आहे. पायरामेड या व्यासपीठावरून स्थानिक डॉक्टरांकडील रुग्णाला विशेष सल्ला देण्यासाठी ते डॉक्टर या व्यासपीठाच्या माध्यमातून विशेष तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतील. त्यामुळे रुग्णाचा शहरात येण्याचा फेरा वाचेल, वेळ आणि पैसेही वाचतील. यामध्ये टेलिफोन अथवा व्हिडीओच्या माध्यमातून रुग्णांपर्यंत पोहोचण्याकरिता सद्यस्थितीत 200 विशेषज्ञ डॉक्टरांची टिम कार्यरत आहे.
निमशहरी किंवा ग्रामीण भागात रुग्णांना वैद्यकीय सेवांचा अत्यल्प लाभ मिळतो किंवा डॉक्टरांना गाठण्यासाठी त्यांना मैलोगणिक प्रवास करावा लागतो. तसेच डॉक्टरांच्या भेटीची वेळ निश्चित करणे हीदेखील वेळेचा अपव्यय करणारी प्रक्रिया आहे. टेलिमेडिसिन्स हा दुर्धर व्याधीग्रस्त रुग्ण, आजारी व्यक्ती यांना त्यांच्या आरोग्यविषयक वैद्यकीय दस्तऐवज डिजिटल स्वरूपात जतन करायला लावणारा मार्ग आहे. आधुनिक आरोग्यसेवेचा हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि जगभरात सराव केला जातो. टेलिहेल्थमुळे शहरी, निमशहरी व ग्रामीण जनतेला आजारविषयक वैद्यकीय इलाज करण्यासाठीचे एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
ग्रामीण भागातील बऱयाचदा पायाभूत सोयीसुविधांचा अभाव दिसून येतो. तसेच वाहनाची सोयदेखील नसते. त्यामुळे एखाद्याला अत्यावशक सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीला शहरापर्यंत किंवा तालुक्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ लागतो. यामुळे शारीरिक त्रास तर होतोच, पण मानसिक त्रासही होतो. पण जर तुमचेच फॅमिली डॉक्टर अथवा जवळचे डॉक्टर (प्रायमरी डॉक्टर) या उपचारप्रणालीत तुमच्यासोबत असतील आणि त्यामुळे तुम्हाला एक विशेष आधारही असेल. तसेच तुमची वैद्यकीय तपासणीही तेच डॉक्टर पायरामेडच्या तज्ञ डॉक्टरांना सांगतील.
ग्रामीण भागात येणारी आव्हाने
ग्रामीण भागात डिजिटल साक्षरता हे एक आव्हान असू शकते. याव्यतिरिक्त ग्रामीण भागातील महिलांमध्ये डिजिटल सहभाग फार कमी प्रमाणात आढळून येतो. तसेच महिलावर्गाला अशा डिजिटल प्लॅटफॉर्मपासून अधिक दूर ठेवले जाते. त्यामुळे याबाबत जनजागृती करणे अधिक गरजेचे ठरते. तसेच, ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सबळ करण्यासाठी या माध्यमातून स्थानिक डॉक्टरांनाही विशेष सल्लामसलत मिळू शकेल. आजघडीला देशात तज्ञ डॉक्टरांची भासणारी उणीव या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे भरून निघण्यास नक्की मदत होईल.
टेलिमेडिसिनचे फायदे
– तुम्ही ज्या डॉक्टरांकडे उपचार घेत आहात तेच डॉक्टर या तज्ञ डॉक्टरांना तुमच्यासोबत जोडून देणार आहेत. त्यामुळे आपण कुठे आहात याची पर्वा न करता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. टेलिफोन अथवा व्हिडीओ कॉलवर तुम्ही सल्ला घेऊ शकता.
– डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी कोणताही प्रवास करण्याची गरज लागणार नाही, त्यामुळे वेळेची नक्कीच बचत होईल
– प्रवासासाठी लागणारे पैसे वाचतील
– डॉक्टरांच्या सल्ल्याकरिता शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही.
– कुटुंबातील सदस्यांचा रुग्णासोबत करावा लागणारा प्रवास टाळणे शक्य होईल.
– सल्लामसलतीसाठी प्रवासाचा खर्च आणि गैरसोय कमी होईल तसेच घरबसल्या रुग्णांना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळेल.
(लेखक बालरोग तज्ञ तसेच पायरामेड टेलिमेडिसिनचे संस्थापक आहेत.)






























































