नगर जिल्ह्याला वर्षभरात मिळणार 321 नवे नगरसेवक, श्रीगोंदा वगळता 14 तालुक्यांत निवडणुकांची रंगणार रणधुमाळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगरपालिका, नगर परिषदा व नगर पंचायतींद्वारे नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी अखंड कार्यरत राहणारे 321 नवे नगरसेवक जिल्ह्याला येत्या वर्षभरात मिळणार आहेत. श्रीगोंदा नगरपालिका वगळता अन्य 14 तालुक्यांतील नगरपालिकांची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता आहे.

डिसेंबर 2021 ते डिसेंबर 2022 या काळात मुदत संपणाऱया नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींचा प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. 14 पैकी 5 नगरपरिषदांच्या मतदारयाद्या झाल्या आहेत. मात्र, कोरोनामुळे तेथील निवडणुका रखडल्या आहेत. आता नव्याने 9 नगरपालिकांचा प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार केला जाणार असून, तो झाल्यावर व त्यांच्या प्रारूप मतदार याद्या तयार झाल्यावर एकाचवेळी या सर्व 14 तालुक्यांतून नगरपालिकांची रणधुमाळी रंगणार आहे.

नगर जिल्ह्यातील सात नगरपरिषदा व दोन नगर पंचायतींची मुदत संपत आहे. त्यात कोपरगाव व राहुरी (नोव्हेंबर 2021), संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, देवळाली प्रवरा व पाथर्डी (डिसेंबर 2021) या नगरपरिषदांसह शिर्डी (डिसेंबर 2021) आणि नेवासा (मार्च 2022) या नगर पंचायतींची मुदत संपत आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. याशिवाय जिल्ह्यातील अकोले, कर्जत, पारनेर या नगर पंचायती तसेच शेवगाव व जामखेड या नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे. तेथील कच्चा आराखडा तयार होऊन तो अंतिम झाल्यावर तेथील प्रारूप मतदार याद्यांचा कार्यक्रमही पार पडला आहे. मात्र, कोरोनामुळे पुढील प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यामुळे या मतदार याद्या अंतिम होण्याचे काम बाकी आहेत.

नगर जिल्ह्यात 10 नगरपालिका, नगरपरिषदा व 5 नगरपंचायती आहेत. या सर्व 15 स्थानिक स्वराज्य संस्थांतून मिळून 341 नगरसेवक दर पाच वर्षांनी निवडून दिले जातात. सध्याच्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत श्रीगोंद्याचा समावेश नाही. त्यामुळे तेथील 20 नगरसेवकांची संख्या वगळता अन्य 14 तालुक्यांतून 321 नवे नगरसेवक निवडले जाणार आहेत. तालुकानिहाय नगरसेवक ः श्रीरामपूर 36, संगमनेर 32, कोपरगाव 32, राहुरी 23, देवळाली प्रवरा 19, राहाता 20, पाथर्डी 20, जामखेड 21 व शेवगाव नगरपरिषद – 23. तसेच नगरपंचायतींपैकी शिर्डी, अकोले, कर्जत, पारनेर व नेवासे या पाचही ठिकाणी प्रत्येकी 19 नगरसेवक निवडले जाणार आहेत.