पुणे – एकमेकांकडे बघण्याच्या रागातून दोघांवर कोयत्याने वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकमेकांकडे पाहण्याच्या कारणातून टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न केल्याची घटना पुण्यात घडली आहे. फैजान शेख (वय.23,रा. मिठानगर कोंढवा) व त्याचा मित्र सलमान अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी खडक पोलिसांनी जुबेर उर्फ वडी मुश्ताक शेख (वय.20,रा. लोहीयानगर), आकीब असद दुल्लाह शेख (वय. 21,रा.कोंढवा) यांना अटक केली आहे.

फिर्यादी शेख हा त्याचा मित्र सलमान याच्यासोबत लोहियानगर येथील दूध डेअरी समोर बोलत थांबला होता. त्यावेळी आरोपी जुबेर त्यांच्याकडे रागाने पाहत होता. त्यामुळे फैजान याने त्याला रागाने पाहण्याचा जाब विचारला. त्यावेळी त्याने दो मिनीट ठेहर मै तेरे को देखता हूं असे म्हणत मित्रांना घेऊन येत फैजान याच्या डोक्यात, हाताच्या पंजावर वार करून गंभीर जखमी केले.

तसेच फैजान याचा मित्र सलमान याच्यावर देखील कोयत्याने वार करण्यात आले आहेत. त्यानंतर आरोपींनी मोठ्या-मोठ्याने ओरडत हातातील कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. टोळक्याच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिकांनी घराच्या खिडक्या बंद करून घेतल्या. काही काळ परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत पोलिसांनी टोळक्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक व्ही.एस.जाधव करीत आहेत.