
रेल्वे विभागात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून तालुक्यातील दोन तरुणांना 10 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या सराईताला संगमनेर ग्रामीण पोलिसांनी आज पुन्हा अटक केली असून, त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, त्याचे दोन साथीदार पसार झाले आहेत.
विजयकुमार श्रीपती पाटील (रा. कांचन अपार्टमेंट, कोंढवा, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, तर रवींद्र कांबळे (रा. कांबळे वस्ती, तासगाव, सांगली) आणि इंगोले (पूर्ण नाव माहीत नाही) हे फरार झाले आहेत.
नितीन गंगाधर जोंधळे (रा. कोकणगाव, ता. संगमनेर) असे फिर्यादीचे नाव आहे. 15 दिवसांपूर्वी अकोले येथे अटक केलेल्या पाटील याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. अकोले येथील गुन्ह्यानंतर या आरोपीला संगमनेर येथील गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे.
पाटील याने नितीन जोंधळे याला रेल्वे विभागात नोकरी लावून देतो म्हणून त्याच्याकडून पाच लाख रुपये घेतले होते. रेल्वे विभागात तिकीट चेकर म्हणून निवड झाल्याचे खोटे पत्रही जोंधळे याला दिले होत. हे सगळे खोटे असल्याचे उघड झाल्यानंतर जोंधळे याने संगमनेर ग्रामीण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. तर, गोरक्षनाथ लहानू गांडोळे (रा. कासारे, ता. संगमनेर) यानेदेखील पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपी पाटील याने महाराष्ट्रात विविध ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे केल्याचे या तपासात उघड झाले आहे. कराड, सातारा, तोफखाना पोलीस स्टेशन नगर, चांदवड, कोल्हापूर या ठिकाणी आरोपी पाटीलविरुद्ध विविध गुन्हे दाखल आहेत.
फिर्यादी दुसऱ्या गुन्ह्यात आरोपी?
पंधरा दिवसांपूर्वी अकोले तालुक्यात याच विजयकुमार पाटील या गुन्हेगारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन त्याला अकोले पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी यातील पाटील याचा साथीदार आणि पसार आरोपी म्हणून नितीन गंगाधर जोंधळे असे नाव अकोले पोलिसांनी जाहीर केले होते. संगमनेर येथे दिलेल्या फिर्यादीत याच नावाचा व पत्त्याचा फिर्यादी असल्याने नेमका तो जोंधळे कोणता, असा संभ्रम निर्माण झालेला आहे.




























































