
सोलापूर महापालिकेने कोरोना लसीकरणाचे 50 टक्क्यांचे उद्दिष्ट पार केले असून, यामुळे शहरातील कोरोना नियंत्रणात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली दिसत असून, शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठय़ावर पोहोचले आहे.
सोलापूर महापालिकेच्या अहवालानुसार शहरातील सहा लाख 40 हजारांपैकी तीन लाख 67 हजार 359 व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीची मात्रा घेतली आहे. यामध्ये पहिली मात्रा घेतलेल्या व्यक्तींची संख्या दोन लाख 58 हजार 813, तर दोन्ही मात्रा घेतलेल्यांची संख्या एक लाख आठ हजार 546 इतकी आहे.
सोलापूर शहरात 18 वर्षांवरील पात्र व्यक्तींची संख्या तीन लाख 66 हजार 276 इतकी आहे. त्यांपैकी एक लाख 20 हजार 331 तरुणांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये 70 हजार 612 जणांनी पहिली मात्रा घेतली आहे. तर, दोन्ही मात्रा घेतलेल्या तरुणांची संख्या 40 हजार 719 इतकी आहे. 45 वर्षांवरील व्यक्तींची संख्या 61 हजार 586 इतकी आहे. यांपैकी 61 हजार 097 जणांनी पहिला तर 20 हजार 405 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
सोलापूर शहरात एक लाख 42 हजार 695 ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांपैकी 49 हजार 978 जणांनी पहिला डोस घेतला असून, 20 हजार 804 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. कोमॉर्बिड व्यक्तींची संख्या 47 हजार 754 आहे. यांपैकी 25 हजार 239 जणांनी पहिली मात्रा घेतली आहे, तर नऊ हजार 629 जणांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत.
सोलापूर शहरातील 11 हजार 6 आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे 11 हजार 186 कर्मचारी यांचेही लसीकरण झाले आहे. 30 ते 44 वयोगटातील चार हजार 27 व्यक्ती, 922 गर्भवती महिला, तसेच 20 हजार 890 विडी कामगार महिला यांनाही कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
शहरातील 16 जानेवारी 2019पासून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे टप्प्याटप्प्याने पात्र नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या मात्रा देण्यास सुरुवात झाली. एकूण 40 लसीकरण केंद्रांवर हे लसीकरण मोफत केले जात आहे. शासनाकडून लस प्राप्त झाल्यानंतर सायंकाळी सात ते आठ या वेळेत नागरिक ऑनलाइन बुकिंग करतात आणि दुसऱया दिवशी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेतात. तसेच शहरातील काही खासगी रुग्णालयांमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे पैसे घेऊन लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महापालिकेच्या लसीकरण समन्वयक डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी केले आहे.
शहराची चार लाख 10 हजार लोकसंख्या ही 18 वर्षांखालील व पाच लाख 90 हजार लोकसंख्या ही 18 वर्षांवरील आहे. 18 वर्षांखालील व्यक्ती सोडल्या तर उर्वरित व्यक्तींचे दोन डोस देऊन संपूर्ण लसीकरण होणे अपेक्षित आहे. दोन डोस घेतलेल्या व्यक्ती या गंभीर स्वरूपाच्या कोविड आजारापासून सुरक्षित आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्या नागरिकांनी अद्यापि कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा एकही डोस घेतलेला नाही, त्यांनी उपलब्धतेप्रमाणे जवळच्या लसीकरण केंद्रावर ऑनलाइन बुकिंग करून व ते शक्य नसल्यास ‘ऑन द स्पॉट’ पद्धतीने लसीकरण करून घ्यावे. ज्या नागरिकांनी दुसरा डोस घेणे अपेक्षित आहे, त्यांनी तत्काळ जवळच्या लसीकरण केंद्रावर ऑनलाइन अथवा ऑन द स्पॉट पद्धतीने नोंदणी करून लसीकरण करून घ्यावे.
– डॉ. मंजिरी कुलकर्णी, लसीकरण समन्वयक, सोलापूर मनपा.





























































