पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर चकमक, पाकिस्तानच्या दोन सैनिकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवर रविवारी झालेल्या गोळीबारात पाकिस्तानच्या दोन सैनिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानी सैन्याने ही माहिती दिली आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे हल्ला झाला आहे. पाकिस्ताननेही दिलेल्या प्रत्युत्तरात तालिबानचे दोन तीन दहशतवादी मारल्याचे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानचे केंद्रीय गृह मंत्री शेख रशीद यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. पाकिस्तानी सैन्यानेही या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे म्हटले आहे.

पाकिस्तानच्या बजौर भागात ही चकमक उडाली आहे. हा भाग आदीवासी बहुल आहे. याच भागात तहरिक ए तालिबान पाकिस्तानचे दहशतवादी लपून बसले आहेत. तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तहरिक ए तालिबान पाकिस्तानने त्याचे स्वागत केले आहे. तहरिक ए तालिबान पाकिस्तान दहशतवादी संघटनेने नेहमीच पाकिस्तानी सैन्याचा विरोध केल आहे. पाकिस्तानात अतिरेकी संघटनांवर कारवाई केल्यानंतर तहरिक ए तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमध्ये आसरा घेतला आहे.